कोल्हापूर : देशातील साखरेच्या दरातील अचानक झालेली वाढ आणि त्यानंतरच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव अश्विन श्रीवास्तव यांची भेट घेतली.
चुकीची आकडेवारी सादर करणाऱ्या साखर कारखान्यांची विशेष पथकांमार्फत तपासणी करून त्यांच्यावर छापे टाकावेत, अशी मागणी त्यांनी केली.
साखर बाजारातील दराच्या चढ-उताराबाबत संशय
गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाली. त्यानंतर अवघ्या आठवडाभरातच दरात मोठी घसरण झाल्याने साखर बाजारातील या चढ-उताराबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या कथित कृत्रिम दरवाढीचा थेट फटका देशातील सामान्य ग्राहकांना बसला असून, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसल्याचा आरोप शेट्टी आणि जानकर यांनी केला.विशेष म्हणजे, साखरेच्या वाढलेल्या दराचा एक रुपयाचाही अतिरिक्त फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला. साखरेच्या दरातील या घडामोडींचा फायदा मूठभर कारखानदार आणि व्यापाऱ्यांना झाल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
साठेबाजीला पाठीशी घालू नका
केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा विभागाने साखरेच्या साठेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या घटकांना पाठीशी घालणे तातडीने थांबवावे, अशी मागणी शेट्टी आणि जानकर यांनी केली.साखर कारखान्यांकडून सादर करण्यात येणाऱ्या उत्पादन, साठा आणि विक्रीच्या आकडेवारीची काटेकोर तपासणी करावी. चुकीची माहिती देणाऱ्या कारखान्यांवर विशेष पथकांमार्फत छापे टाकून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केंद्रीय अधिकाऱ्यांकडे केली.
कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
साखरेच्या दरातील कथित गैरप्रकार आणि फसवणुकीवर केंद्र सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी दिला. साखरेच्या दरवाढीचा फायदा ग्राहकांकडून वसूल होतो, मात्र त्याचा लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे साखर उद्योगातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

