पुणे : देशाचे अर्थकारण कृषी क्षेत्राशी संबधित आहे, पण या क्षेत्राचा स्वातंत्र्यापासून अपेक्षित विकास अद्याप झालेला नाही, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावरील परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवायचे असेल, देशाला महासत्ता बनवायचे असेलत तर कृषी विकासाचा दर वाढवायला लागेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा साखर उद्योगाशी संबधित आहे. तेल आयातीसाठी भारताचे 23 लाख कोटी रुपये दरवर्षी खर्च होतात. हेच पैसे आपल्या देशातील ग्रामीण शेतकऱ्याच्या खिशात गेले तर गावातील गरिबी आणि बेरोजगारी दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले.
मंत्री गडकरी म्हणाले कि, अडचणीतील साखर उद्योगाला बाहेर काढण्यासाठी मार्ग काढायला पाहिजे. आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाताही आहे. इथेनॉलमुळे साखर उद्योगाला मोठा आधार मिळाला. इराक आणि अमेरिका युद्धामुळे जगाला इथेनॉलचे महत्व पटले. देशात पेट्रोलमध्ये जास्तीत जास्त इथेनॉल मिश्रणासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी, साखर उद्योग आणि सरकारलाही फायदा आहे. 100 टक्के इथेनॉल वापरासाठी प्रयत्न सुरु आहेत. इथेनॉल आणि सीएनजीचा वापर वाढल्यास आपले पेट्रोल- डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, , राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, आमदार दिलीप वळसे - पाटील, महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नारा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले आदीसह साखर कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

