Dailyhunt
जागतिक स्तरावर साखर उत्पादनात घटण्याचे अनुमान, ब्राझीलचाही इथेनॉल उत्पादनावर भर

जागतिक स्तरावर साखर उत्पादनात घटण्याचे अनुमान, ब्राझीलचाही इथेनॉल उत्पादनावर भर

कोल्हापूर : ब्राझीलमधील साखर उत्पादनातील घट आणि जागतिक साखर निर्यातीत येणारी घट यामुळे भारतीय साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी राहू शकते. मात्र देशांतर्गत इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि साखरेचे दर स्थिर ठेवण्याचे आव्हान सरकारसमोर असेल.

जागतिक बाजारातील ही उलथापालथ येणाऱ्या काळात साखर उद्योगाची समीकरणे बदलून टाकणारी ठरू शकते, असा साखर उद्योगाचा अंदाज आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन महागल्याने ब्राझीलसारख्या देशांद्वारे इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य दिले जात आहे. ब्राझीलमध्ये एप्रिलपासून नव्या गाळप हंगामाची सुरुवात होत आहे. ब्राझीलने इथेनॉल उत्पादन वाढवल्यास जागतिक बाजारपेठेत साखरेची उपलब्धता कमी होईल.

गेल्या हंगामात ब्राझीलमध्ये ४३० लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा त्यात घट होऊन उत्पादन ४०० लाख टनांपर्यंत सीमित राहू शकते. ब्राझीलकडून गेल्यावर्षी सुमारे ३३० लाख टन साखर निर्यात झाली होती. मात्र, आता पश्चिम आशियातील युद्धाच्या स्थितीमुळे यंदा ही निर्यात २९० लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. केवळ साखर निर्यातच नव्हे, तर एकूण उत्पादनातही तूट दिसून येईल, असा अंदाज आहे. युद्धजन्य परिस्थिती मुळे कडाडलेल्या इंधनाच्या दराचे पडसाद जागतिक साखर बाजारात उमटू लागले आहेत. ब्राझीलमध्ये ऊसापासून साखरेऐवजी इथेनॉल निर्मिती वाढविण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतातही इथेनॉल उत्पादनावर भर दिला जाऊ शकतो, असे चित्र आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi