जालना : जिल्ह्याच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'रायझिंग जालना' या विशेष सोहळ्यात नव्या प्रकल्पाच्या सामंजस्य कराराची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यात ऊस शेतीत तंत्रज्ञानाची नवी क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने 'सुपर ५० एआय फार्मर्स' या अभिनव प्रकल्पाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ५० प्रगतिशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या शेतांची सतत सॅटेलाइटच्या माध्यमातून पाहणी केली जाणार असून, गोळा झालेल्या डेटाचे एआय तंत्रज्ञानाद्वारे विश्लेषण केले जाणार आहे. या विश्लेषणाच्या आधारे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइल अॅपवर अचूक, वेळेवर आणि शेतानुरूप सूचना मिळणार आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील ऊस शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र कृषी विभाग आणि फाइंडेबिलिटी सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक सक्षम करण्याचा यामागचा उद्देश आहे. या अॅपमध्ये पीक आरोग्य स्कोअर, शेतातील विविध भागांतील वाढीचा अभ्यास, पाणी व खत व्यवस्थापनासाठी शिफारसी, तण ओळख आणि कापणी नियोजन यांसारखी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. याबाबतच्या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवडलेले शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी तसेच फाइंडेबिलिटी सायन्सेसची टीम उपस्थित होती. या प्रकल्पाद्वारे खर्चात बचत होऊन अधिकाधिक शेतकरी या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतील.

