Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जालना : जिल्ह्यातील काही तालुक्यात उसावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

जालना : जिल्ह्यातील काही तालुक्यात उसावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

ChiniMandi Marathi 2 weeks ago

जालना : घनसावंगी तालुक्यातील अनेक भागांत सध्या ऊस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने उसाला अपेक्षित पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. पाण्याअभावी उसाची पाने पिवळसर पडणे, करपा तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते.

काही ठिकाणी उसाची वाढही अपेक्षित प्रमाणात होत नसल्याने आगामी उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागडी कीटकनाशके व बुरशीनाशकांची खरेदी करून फवारणी करावी लागत आहे. फवारणी यंत्राचा खर्चही वाढत असल्याने ऊस उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाअभावी एकीकडे पिकाला पाण्याची गरज भासत असताना दुसरीकडे रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

पाऊस आणखी लांबल्यास उसाची वाढ मंदावून वजन आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. खरीप पिकांवरही संकट निर्माण झाले आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. पाण्याच्या ताणामुळे उसाची वाढ खुंटत आहे. त्यातच वातावरणातील बदलामुळे उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरी ड्रोनव्दारे फवारणी करीत असल्याने खर्चातही मोठी वाढ होत आहे. पाऊस वेळेवर पडला असता तर उसाची वाढ चांगली झाली असती. सध्या पीक पाण्याच्या ताणात आहे. रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने वारंवार फवारणी करावी लागत असून औषधांचा खर्च वाढला आहे. सध्या ऊसात फवारणी करण्यासाठी एकरी ५०० रुपये द्यावे लागत असल्याची व्यथा ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi