कोल्हापूर : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ चे गळीत हंगामातील सर्व उसाची प्रतीटन ३४०० रुपयांप्रमाणे १०० टक्के एफआरपीची रक्कम विनाकपात १८ कोटी २३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केलेली आहे.
कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या सभासद, बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊस बिलाची रक्कम व तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी तोडणी वाहतूक बिलाची रक्कम सबंधित बँकेशी संपर्क साधून उचल करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या कारखाना आधुनिकीकरणामध्ये निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याचे काम सुरू असून, येत्या २०२६-२७ चे गळीत हंगामामध्ये ५ लाख मे. टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, अशी माहिती देण्यात आली.
कारखान्याने १६ जानेवारीपासून गळीत हंगाम संपेपर्यंत संपूर्ण तोडणी वाहतूक बिलाची वसुली वजा जाता रक्कम ६६ लाख इतकी संबंधित तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या खात्यावर जमा केली आहे. संचालक मंडळाने ऑफ सिझनमध्ये कारखाना व डिस्टिलरी आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले. मात्र कामाची व्याप्ती मोठी असल्याने कामास विलंब झाला. त्यामुळे नंतर कारखाना घाईने सुरू करण्यात आला. हंगाम सुरू झाल्यानंतर झालेल्या कामांमध्ये समस्या निर्माण झाल्याने गळीतामध्ये काही प्रमाणात व्यत्यय निर्माण होऊन अपेक्षित गाळप झालेले नाही. आता मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या ऊस नोंदी करून कारखान्यास सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण व संचालक मंडळाने केले.

