कोल्हापूर : दौलत साखर कारखाना हा अथर्व दौलत प्रशासनाने हाती घेऊन गेले सहा वर्षे अतिशय सक्षमपणे व योग्यरीत्या चालवलेला आहे. शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत देऊन चंदगडच्या शेतकऱ्यांना फार मोठा आधार दिला आहे.
शेतकऱ्यांची कोणतीही देय रक्कम कारखान्याने बाकी ठेवलेली नाही. तरीही काहीजण जाणीवपूर्वक कारखाना बंद करण्याचे किंवा काहीतरी अडचणी निर्माण करणाचे कटकारस्थान करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने योग्य तोडगा काढावा, यासाठी चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांना दौलत बचाव कृती समितीने निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, इतकी वर्षे खच खात पडलेला दौलत कामगार आज सक्षम करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यांचे आजपर्यंतचे सर्व पगार वेळेत आदा करून प्रशासनाने त्यांना सहकार्य केले आहे. जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठरल्याप्रमाणे व तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मध्यस्थीने गाळप हंगाम २०२५-२६ सुरू होण्यापूर्वी कारखान्याची आर्थिक परिस्थिती नसताना कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना पगार वाढ, महागाई भत्ता, रिटेन्शन हुद्देवारी या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. मात्र, वेळोवेळी हा दौलत कारखाना व्यवस्थित चालत असताना काही संघटनेचे ठराविक पदाधिकारी व राजकीय लोक अथर्व दौलत प्रशासनाला विनाकारण बदनाम करून कामगारांना व कारखान्याला वेठीस धरून निवडक पदाधिकारी स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत. जर हे असेच चालू राहिले आणि कारखाना बंद पाडला तर शेतकऱ्यांचे, तोडणी वाहतूकदारांचे व कामगारांचे न भरून निघणारे असे फार मोठे नुकसान होणार आहे , असे दौलत बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. यासाठी आम्ही कार्यालयासमोर ३ एप्रिलपासून धरणे आंदोलनाला बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यावेळी पदाधिकारी रघुनाथ पाटील, पांडुरंग कांबळे, संतू पाटील, गणेश फाटक आदी उपस्थित होते.

