कोल्हापूर : हलकर्णीतील 'दौलत-अथर्व'चा गळीत हंगाम यशस्वी पार पडल्यानंतर आता अचानक दौलत कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे अथर्व दौलत प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघटनेकडून वीज, पाणी व सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर न येण्यासाठी धमकी देऊन दबाव टाकण्यात येत आहे.
शुक्रवारी (दि. ३) वीज, पाणी, सेवा सुरक्षा देणारे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने कारखाना बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. वीज, पाणी, सुरक्षा कर्मचाऱ्यांअभावी कारखाना अडचणीत आला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
याबाबत अथर्व-दौलत साखर कारखान्याने प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार गरजेप्रमाणे कामगार आणि त्यानुसार आकृतीबंधाची अंमलबजावणी अथर्व दौलत व्यवस्थापन करणार आहे. अथर्व प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत कामगारांच्या नऊ मागण्या मान्य केल्या. आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीने या मागण्या पूर्ण करायचे ठरले होते. त्यामुळे समझोता म्हणून कामगार व अथर्व दौलत प्रशासनामध्ये करार करायचे ठरले. करार करण्यापूर्वी प्रशासनाने पगारवाढीचा पहिला हप्ता, महागाई भत्ता अदा करून कारखान्याने सहकार्याची भूमिका पार पाडली, असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

