कोल्हापूर : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने तेथील दोन व्यापाऱ्यांकडील गुळाची तपासणी केली असता त्यात रासायनिक रंग आढळला. हा गूळ कोल्हापुरातून खरेदी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर येथील संबंधित व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबतची माहिती मिळताच शाहू मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी रंगमुक्त गूळच खरेदी करू, असा निर्णय घेतला. कोल्हापुरी गुळामध्ये रासायनिक रंग आढळल्याच्या घटनेचे पडसाद सोमवारी बाजार समितीत उमटले. व्यापाऱ्यांनी खरेदीस अचानक नकार दिल्याने तीन तास गुळाचे सौदे ठप्प झाले. शेतकरी व व्यापारी यांच्यातील चर्चेनंतर दुपारी बाराच्या सुमारास व्यवहार पुन्हा सुरू झाले.
सध्या बाजारात हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील गूळ रव्यांची आवक सुरू आहे. मात्र, गुजरातमधील या प्रकारानंतर व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली. रासायनिक रंगमुक्त गुळच खरेदी केला जाईल अशी भूमिता त्यांनी घेतली. त्यामुळे शेतकरी हताश झाले. गूळ विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी माल परत नेल्यास नुकसान होईल, त्यामुळे खरेदी सुरू ठेवावी, अशी मागणी केली. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी लहान गूळ रव्याचे सौदे सुरू करण्यास सहमती दर्शवली. दरम्यान, सौदे बंद झाल्यानंतर बाजार समितीचे कोणीही प्रतिनिधी गूळ सौदे स्थळी आले नाहीत. शेतकरी व व्यापारी यांच्यातच चर्चा होऊन तोडगा काढण्यात आला आणि गूळ सौदे सुरू झाले. गूळ निर्मितीत रासायनिक रंगांचा वापर टाळावा, असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.

