सांगली : 'य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने नावीन्यपूर्ण योजना राबवत आदर्श निर्माण केला आहे. आता जलसिंचनच्या नूतनीकरणासाठी मदत मिळवून नवीन योजना राबवण्याचा मानस आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे.
आधुनिक ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ठिबकमुळे उत्पादनात निश्चितच वाढ होईल. ‘कृष्णा’ने स्वतःच्या योजना सुरू करून साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. पेठ (ता. वाळवा) येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात बोलत होते.
डॉ. भोसले म्हणाले की, गेल्या ११ वर्षांत कारखान्यात बदल व सुधारणा करण्यात आल्या. इथेनॉल प्रकल्प, डिस्टिलरीमध्ये सुधारणा या उपक्रमांमुळे कारखाना सक्षम झाला. इतर कारखान्यांना तोटा सहन करावा लागला असताना ‘कृष्णा’ने मात्र स्थिरता राखली. आधुनिकीकरण करत क्षमता वाढ केली आहे. मोफत साखर, नेहमीच चांगला दर देत, अनेक वेळा उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली. राज्य व देश पातळीवरील अनेक पुरस्कारही कारखान्याने पटकावले. आमचे इतर कारखान्यांनीही अनुकरण केले आहे. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, संजय पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील, संपतराव पाटील, ‘आत्मशक्ती’चे अध्यक्ष अभिराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंदा माळी, धोंडिराम कदम, ‘शिवाजी केन’चे संचालक संदीप पाटील, नामदेव कदम, फिरोज ढगे, संग्राम वारके, शेखर बोडरे, दिलीप पाटील, विजय पाटील, मोहन मदने, पूनम पाटील, खलिल मुल्ला, हेमंत पाटील, जयंत पाटील, हंबीरराव पाटील, शहाजी नायकल, जयकर कदम यांची उपस्थिती होती.

