Dailyhunt
महाराष्ट्र : उसाच्या कमतरतेमुळे अनेक कारखान्यांकडून निर्धारित वेळेपेक्षा आधीच गाळप बंद

महाराष्ट्र : उसाच्या कमतरतेमुळे अनेक कारखान्यांकडून निर्धारित वेळेपेक्षा आधीच गाळप बंद

सातारा : यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील सर्व २१० कारखान्यांनी १० कोटी ४२ लाख ७९ हजार २२८ टन उसाचे गाळप करून ९ कोटी ८८ लाख २१ हजार ६६२ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. यंदा ऊस लागवडीत कमतरता आल्याने अनेक कारखान्यांना निर्धारित वेळेपेक्षा आधीच गाळप बंद करण्याची वेळ आली.

अनेकांना दैनंदिन गाळपाला ऊस मिळाला नसल्याचे वास्तव आहे. कोल्हापूर विभागात सुमारे २.१० कोटी मेट्रिक टन ऊस गाळप होऊन २.३१ कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले असून साखर उतारा सुमारे ११.०२ टक्के आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश साखर कारखाने हे फेब्रुवारीच्या मध्यातच बंद पडले आहेत. यावर आता दीड महिना उलटूनही अनेक कारखान्यांनी एफआरपी अदा केलेली नाही. तर सोलापूर जिल्ह्यात २३ कारखान्यांनी चुकीची माहिती देवून साखरेच्या प्रादेशिक सहसंचालकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्याचा सरासरी उतारा हा ९.४८ टक्के आला आहे. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक साखर उताऱ्याची नोंद केली आहे. पुणे विभागात २.२४ कोटी मेट्रिक टन गाळपातून २.२१ कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. या विभागात साखर उतारा ९.८६ टक्के आहे. सोलापूर विभागात २.२० कोटी मेट्रिक टन ऊस गाळपातून १.८९ कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अहिल्यानगर विभागात १.२५ कोटी मेट्रिक टन गाळपातून १.१३ कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi