पुणे : येथील सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रादेशिक सहासंचालक तथा जिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (ता. २४) मतदार यादी प्रसिद्ध केली. कारखान्याच्या 'अ' वर्ग मतदारसंघात २७ हजार ६२६ सभासदांचा, तर 'ब' वर्ग मतदारसंघातून १४१ सभासद संस्थांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे.
या यादीवर ६ ऑगस्टपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. कारखान्याची मागील निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान झाले होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड ८ नोव्हेंबरला झाली होती. या वेळी वेळेत मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने सप्टेंबरमध्ये निवडणूक कार्यक्रम लागेल आणि ऑक्टोबरमध्ये मतदान होईल, असे जवळपास स्पष्ट होऊ लागले आहे. सध्या तरी तीन ते चार गट निवडणुकीसाठी उत्सुक दिसत आहेत. निवडणूक बिनविरोध होणार की लढत होणार, हे आता लवकरच स्पष्ट होईल.
सोमेश्वर कारखाना स्थापनेपासून काकडे गटाकडे होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सन १९९२ मध्ये पहिल्यांदा सत्ता परिवर्तन झाले. त्यानंतर १९९७, २००२, २००७, २०१५, २०२१ अशा निवडणुका अजित पवार यांनी एकहाती जिंकल्या. सातवी निवडणूक प्रथमच अजित पवार यांच्याशिवाय होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी कारखान्याची मतदार यादी कारखाना कार्यस्थळ, तहसील कचेरी, प्रादेशिक सहसंचालक कार्यालय, सहायक निबंधक कार्यालय अशा चार ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावर हरकती व आक्षेप २४ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत स्वीकारले जाणार असून, त्यावरील निर्णय १७ऑगस्टपर्यंत दिला जाणार आहे. २२ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. मागील निवडणुकीत २५ हजार ६७७ होते. आता १९४९ मतदार वाढले आहेत. मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने सभासदांमध्ये राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

