पुणे : केवळ साखर उत्पादन करून साखर उद्योग तग धरू शकणार नाही. साखर उद्योग टिकण्यासाठी साखरेबरोबरच इथेनॉल, सहवीज यासह इतर उपउत्पादने घ्यावी लागतील. कारखान्यांना उत्पनाचे नवीन स्त्रोत शोधावे लागतील, तरच हा उद्योग टिकेल, असे मत राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी व्यक्त केले.
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.
डॉ. कोलते यांनी सांगितले कि, राज्याचा गाळप हंगाम नुकताच संपला. यावर्षी 16.53 लाख हेक्टरवर ऊस लागवड होती आणि 1300 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त ऊस उत्पादन झाले. राज्यात 1045 लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप झाले आहे. 210 साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. राज्यात 156 इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित असून त्यापैकी 84 सहकारी आणि 72 खाजगी आहेत. राज्याची इथेनॉल उत्पादन क्षमता 297 कोटी लीटर असून गेल्यावर्षी 104 कोटी लीटर इथेनॉलचा तेल कंपन्यांना पुरवठा करण्यात आला आहे. राज्यातील इथेनॉल उद्योगाची एकूण उलाढाल 7 हजार कोटीच्यावर असल्याचे सांगत त्यांनी साखर कारखान्यांना उत्पन्नाचे आणखी स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले
यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, महासचिव पांडुरंग राऊत, खजिनदार महेश देशमुख, संचालक रोहित नारा आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले आदीसह साखर कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

