Dailyhunt
सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसह अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

सांगली : हुतात्मा सहकारी साखर कारखान्याच्या कर्जमुक्तीसह अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

सांगली : हुतात्मा साखर कारखान्यात सध्या राजकीय संघर्ष सुरू आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा कारखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या वीस वर्षांपासून नेतृत्व करणारे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या कारभारावर कुटुंबातील सदस्यांनीच गंभीर आरोप केले आहेत.

कारखान्यावर सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा आरोप करत हे कर्ज फेडून कारखाना कर्जमुक्त करावा आणि अध्यक्षांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. कुटुंबातील सदस्यांनी हे आंदोलन उभारल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अध्यक्ष वैभव नायकवडी अद्याप आंदोलकांसमोर आलेले नसून त्यांच्या प्रतिनिधीमार्फत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत किरण नायकवडी, गौरव नायकवडी आणि केदार नायकवडी यांनी सांगितले की, गेल्या चार महिन्यांपासून अध्यक्षांकडे मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस दखल घेतली गेली नाही. केवळ वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे १५ गावांतील सभासद व शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून कारखान्यासमोर आंदोलन करत आहेत. मात्र कोणताही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन कधी थांबणार याबाबत अनिश्चिततेची स्थिती आहे. या घडामोडींमुळे राज्यभरातील सहकारी साखर कारखाने व चळवळींचे लक्ष हुतात्मा कारखान्याकडे लागले असून, या संघर्षाचा शेवट कसा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi