सांगली : ऊस पिकामध्ये विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्याचा प्रभावी वापर केल्यास कमी खर्चात एकरी उत्पादन वाढविणे शक्य आहे. तेव्हा युवा पिढीने शेती क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्यामार्फत आळसंद येथील प्रगतशील शेतकरी दिलीप सव्वाशे यांच्या शेतावर आयोजित ऊसपीक शिवार फेरी व चर्चासत्रात ते बोलत होते. “ऊस शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य आहे. तरुणांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आधुनिक पद्धतींचा अवलंब करून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार लाड म्हणाले, की, यंदा पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून या परिस्थितीवर मात करण्याची आवश्यकता आहे. क्रांती साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिला असून आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांना एकरी ६० टनांपेक्षा अधिक सरासरी उत्पादन घेण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी प्रास्ताविक केले. आदित्य सव्वाशे यांनी आपल्या ऊस लागवडीविषयी माहिती दिली. शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी आभार मानले. संचालक संग्राम जाधव, वैभव पवार, रामचंद्र देशमुख, माजी संचालक अरुण कदम, कार्यकारी संचालक आप्पासाहेब कोरे, शेती अधिकारी दिलीप पार्लेकर, प्रवीण जाधव, विनोद जाधव, राधेश्याम जाधव, किरण कचरे, अण्णासाहेब जाधव, संजय जाधव, तानाजी सुर्वे, संपतराव जाधव, विजय पवार, जगन्नाथ पाटील उपस्थित होते.

