सांगली : सोनहिरा कारखान्यास २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊस तोडणी आणि वाहतूक यंत्रणा पुरवितो, असे सांगून सुमारे पन्नास लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित शिवाजी शिंदे, भाऊसाहेब घुले यांनी तोडणी मजूर पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने १६ डिसेंबर २०२५ रोजी कारखाना कार्यस्थळावर वाहतूक संस्थेशी करार करून आगाऊ ५० लाख रूपये संस्थेला दिले.
संशयितांनी पैसे आगाऊ घेतल्यानंतर कारखान्याला गळीत हंगामात ऊस तोडणी यंत्रणा किंवा वाहतूक पुरविली नाही.
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांनी गुरूवारी चिंचणी-वांगी पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. ऊसतोडणी यंत्रणा व वाहतूक पुरवितो, असे सांगून ५० लाख रूपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला. याबाबत शिवमल्हार वाहतूक संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तुळशीराम शिंदे (रा. गाडेवाडी, ता. पाथर्डी, अहिल्यानगर), सचिव भाऊसाहेब शिवाजी घुले (रा. कोळसांगवी, ता. पाथर्डी) या दोघांविरुद्ध चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

