सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचाच आहे. सभासदांना दरवर्षी १२० किलो साखर मोफत दिली जाईल, अशी घोषणा कृषिमहर्षी आबासाहेब मोहिते संस्थापक पॅनेलच्या नेत्या अर्चना मोहिते यांनी केली.
संस्थापक पॅनेलतर्फे आयोजित पत्रकार परिषेदत त्या बोलत होत्या. निवडणुकीत जी आश्वासने देऊ, ती सत्तेत आल्यावर १०० टक्के पूर्ण करू. कारखान्याच्या सुमारे नऊ हजार सभासदांचे शेअर्स ट्रान्स्फर झालेले नाहीत. आम्ही सत्तेत आल्यानंतर गट-तट न पाहता सरसकट नऊ हजार शेअर्स ट्रान्स्फर करून देऊ. पाणीपट्टी पैशातच आकारली जाईल. पाणीपट्टीचा वार्षिक दर सात हजार ५०० एकरी एवढा असेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अविनाश मोहिते उपस्थित होते.
अविनाश मोहते यांनी निवडणुकीपूर्वी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, मानसिंगराव नाईक, मोहनराव कदम, जितेश कदम, संग्राम देशमुख, आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, निशिकांत पाटील, सम्राट महाडिक यांना भेटून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली असल्याचे सांगितले. सत्तेत पाच वर्षे होतो. सत्तेत आल्यावर महिन्याला पाच किलो साखर दोन रुपये दराने दिली होती. इरिगेशनच्या योजनांना स्वतंत्र वीज फिडर टाकून पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली होती याची आठवण त्यांनी करून दिली.

