Dailyhunt
सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

ChiniMandi Marathi 2 weeks ago

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते व्हा. चेअरमन कैलास खुळे, उमेश परिचारक, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी व सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडला.

विधिवत पूजन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले, कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेता यावे व त्यामध्येही आधुनिकीकरणाचा वापर व्हावा, यासाठी एआय तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचाही ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

ते म्हणाले, कारखाना स्तरावरून एआय तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे. एआय तंत्रज्ञान ही योजना कारखाना, शेतकरी व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे, असे सांगितले. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२६-२७साठी सुमारे १०,५०० हेक्टर क्षेत्राच्या ऊसनोंदी आहेत. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे ऊसक्षेत्रात चढउतार होऊ शकतो. या हंगामात उपलब्ध होणाऱ्या संपूर्ण उसाचे वेळेत गाळप केले जाणार आहे. कारखान्यामार्फत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस विकासाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. गळीत हंगाम २०२६-२७ हा विनाखंड चालविण्यासाठी कारखान्यामधील सर्व कामे सुरू असून ती वेळेत पूर्ण केली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi