सोलापूर : पुणे जिल्ह्यातील घाटमाथा आणि भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरणांमधून भीमा नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग सातत्याने कमी-जास्त होत आहे.
उजनी धरणातून सुमारे ९० हजार क्युसेक, तर वीर धरणातून नीरा नदीमार्गे सोडण्यात आलेले पाणी भीमा नदीत एकत्र आल्याने नदीला महापूर आला आहे. महापुराने दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांतील जनजीवन धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. नदीकाठच्या सुमारे ५ ते ६ हजार हेक्टरवरील ऊस, केळी, सोयाबीन, मका आणि भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये महापुराची टांगती तलवार कायम आहे. वीर आणि उजनी धरणातून सोडलेले पाणी आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या हत्तरसंग आणि कुडल येथील ऐतिहासिक संगमेश्वर मंदिराच्या संगमापर्यंत पोहोचले आहे. पुराच्या या रौद्ररूपामुळे नदीकाठच्या लोकांचे जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे.
महापुरामुळे या भागातील शेकडो शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ११ प्रमुख बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून महाराष्ट्र-कर्नाटक आंतरराज्य वाहतुकीला फटका बसला आहे. सरकारने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे. सध्या दोन्ही धरणांतून मिळून सुमारे १.५ लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात होत आहे. त्यामुळे पिके सडून उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊस, केळी, सोयाबीन, मका, भाजीपाल्याची लागवड धोक्यात आहे. सुमारे ६ हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. अक्कलकोट तालुक्यांतील पूरस्थितीही गंभीर आहे. नदीकाठच्या शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील आळगी, खानापूर आणि हिळ्ळी येथील प्रमुख बंधारेही पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा परस्परांशी असलेला संपर्क तुटला आहे. भीमा नदीकाठी वसलेल्या कुसूर आणि वडापूर गावांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. धरणांमधून आणखी पाणी सोडल्यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून ते सडण्याच्या अवस्थेत आहे. शासनाने उशीर न करता तात्काळ पंचनामे सुरू करावेत अशी मागणी दक्षिण सोलापूरमधील कुसूरचे शेतकरी मदगोंडा हक्के यांनी केली.

