सोलापूर : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे चेअरमन तथा माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या माढा येथील निवासस्थानावर तिरडी मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी पाटील, आजिनाथ परबत, सिद्धेश्वर घुगे, सत्यवान गायकवाड व बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कारखान्याकडे थकीत असलेले ऊस बिल तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चेकरी साठे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देऊन बसले. यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीने कारखान्यावर आरआरसीची कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर माढा तहसील कार्यालयाच्या वतीने मंडलाधिकारी प्रसाद सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन आरआरसी कारवाई कोणत्या पद्धतीने सुरू आहे, याबाबत मोर्चेकऱ्यांना माहिती दिली. मात्र, या स्पष्टीकरणाने शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.
यानंतर तहसीलदार संजय भोसले यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन थेट श्री संत कुर्मदास कारखान्यावर भेट दिली. तहसीलदारांनी स्वतः कारखान्याशी संबंधित कागदपत्रांची छाननी केली. आरआरसी कारवाईच्या अनुषंगाने कारखाना प्रशासनाला दुसरी नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, कारखाना प्रशासनाच्या वतीने थकीत ऊस बिलाबाबत शेतकरी संघटनेला लेखी आश्वासन देण्यात आले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी तिरडी मोर्चा आंदोलन तूर्तास स्थगित केले.

