सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहाकरी साखर कारखाना व्यवस्थापनाने सभासद शेतकऱ्यांना मोबाईलवरून ऊस शेतीचे अचूक मार्गदर्शन मिळावे यासाठी महिंद्रा ॲण्ड महिंद्रा व यिल्ड क्राफ्ट ॲग्रो या नामांकित कंपन्यांशी करार केला आहे.
कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आ. बबनराव शिंदे यांनी ही माहिती दिली. प्रति एकर शंभर टन योजने अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ऊस तंत्रज्ञ संजीव माने व सुरेश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही योजना चालू केल्यापासून शंभर टनाच्या पुढे अनेक शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घेतले आहे. आता नवी योजना राबवली जात असून अशा प्रकारचा करार करणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना ठरला असल्याचा दावा त्यांनी केला.
याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.एस. एन, डिग्रजे यांनी सांगितले की, कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. आता अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचे वापरामुळे शेतकऱ्यांना ऊस पिक जोपासनेसाठी अचूक मार्गदर्शन मिळणार आहे. सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा व या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. सभासद शेतकऱ्यांच्या ऊस पिकावर देखरेख ठेवण्यासाठी व अचुक मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने एआय तंत्रज्ञानाचा वापर कारखान्याने सुरु केला आहे. या उपक्रमामुळे उपग्रहाच्या मदतीने शेतकन्यांच्या ऊसाच्या पिकाची वाढ कशी होत आहे ते आता मोबाईलवर पाहता येणार आहे. कारखान्याचे संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या पुढाकाराने यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा व यिल्ड क्राफ्ट अॅग्रो या नामांकित कंपन्यांशी करार करण्यात आला. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी दर हंगामाला फक्त १५० रुपये खर्च येणार आहे.

