Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोमेश्वर कारखान्याच्या भवितव्यासाठी सभासदांना केंद्रस्थानी ठेवा : खासदार सुप्रिया सुळे

सोमेश्वर कारखान्याच्या भवितव्यासाठी सभासदांना केंद्रस्थानी ठेवा : खासदार सुप्रिया सुळे

ChiniMandi Marathi 2 weeks ago

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याचा विचार करताना सभासद आणि कारखाना या दोन्हींना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

कारखान्याच्या कारभारात राजकारण न आणता तो अधिक चांगल्या पद्धतीने चालविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्रावण महिन्याचे औचित्य साधून खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमेश्वर (करंजे) येथील श्री शंभू महादेव मंदिरात दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणातील सभागृहात त्यांनी नागरिक, कारखान्याचे सभासद आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

सुळे यांच्या सोमेश्वर दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांच्या सोमेश्वर दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, "सोमेश्वर कारखान्याच्या बाबतीत सर्वत्र अस्वस्थता जाणवत आहे. हा सहकार चळवळीतील महत्त्वाचा कारखाना आहे. त्यामुळे कारखान्याच्या कारभारात कोणतेही राजकारण न आणता तो चांगल्या पद्धतीने चालविला गेला पाहिजे." कारखान्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींनी सभासद आणि कारखाना या दोन्हींना केंद्रबिंदू मानून काम करणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, "जो कोणी कारखान्याची जबाबदारी घेणार असेल, त्याने ती घ्यावी. सर्वानुमते निर्णय झाला तर आनंदच आहे. माझा नेहमीच प्रयत्न असतो की, सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे."

एकमत न झाल्यास निवडणुकीशिवाय पर्याय नाही

सोमेश्वर कारखाना हा केवळ एक उद्योग नसून चार तालुक्यांतील हजारो सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांच्या जीवनाशी जोडलेली महत्त्वाची सहकारी संस्था आहे. त्यामुळे कारखान्याचे हित आणि सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेतले जाणे गरजेचे असल्याचे सुळे यांनी नमूद केले.आगामी निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट करताना सुळे म्हणाल्या, "सभासद आणि कारखाना केंद्रबिंदू ठेवून काम केले पाहिजे. यातून एकमत झाले नाही, तर निवडणुकीशिवाय पर्याय नाही."सुळे यांच्या या भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्याच्या आगामी निवडणुकीबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेला आणखी वेग आला आहे.

सभासद, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

यावेळी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ताजी चव्हाण, मुरूमचे माजी सरपंच प्रदीप कणसे, प्रदीप शेडकर, केतन भोसले, हरिभाऊ जगताप, शशांक पवार, संभाजी होळकर, सागर मदने, प्रियंका शेंडकर, वनिता बनकर, सोनाली गायकवाड, अंकिता मगर, नुसरत इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: ChiniMandi Marathi