सोशल मीडियावरील लिंकपासून सावध राहा…
मुंबई : देशाच्या विकासाचा पुढील आराखडा निश्चित करणाऱ्या 'जनगणना २०२७' या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदाची जनगणना ही भारताच्या इतिहासातील पहिली 'डिजिटल जनगणना' ठरणार असून, नागरिकांना प्रथमच 'स्व-गणना' या सुविधेद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येणार आहे.
मात्र, या प्रक्रियेच्या नावाखाली सोशल मीडियावर काही बनावट अर्ज व्हायरल होत असल्याने राज्य सरकारने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या सोशल मीडियावर जनगणनेच्या नावाखाली एक अनधिकृत अर्ज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे की, हा अर्ज पूर्णतः बनावट आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर किंवा सोशल मीडियावरील अर्जावर आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असे आवाहन सरकारने केले आहे.
२०११ नंतर तब्बल १५ वर्षांनी ही प्रक्रिया होत आहे. यावेळेस मोबाइल अॅप्सचा वापर आणि 'रिअल टाइम मॉनिटरिंग'वर भर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, १९३१ नंतर पहिल्यांदाच या जनगणनेत 'जातनिहाय' माहिती संकलित केली जाणार आहे. जनगणनेची ही संपूर्ण प्रक्रिया अधिक अचूक आणि पारदर्शक व्हावी, यासाठी नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कशी कराल अधिकृत नोंदणी?
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नागरिकांकडे दोनच अधिकृत पर्याय उपलब्ध आहेत:
१. स्व-नोंदणी (१ ते १५ मे २०२६) : नागरिक https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ३३ प्रश्नांची माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यावर मिळणारा 'SE ID' जपून ठेवावा, जो नंतर प्रगणकाच्या भेटीवेळी पडताळला जाईल.
२. थेट माहिती (१६ मे ते १४ जून २०२६) : जे नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकणार नाहीत, त्यांच्या घरी अधिकृत प्रगणक येतील. या कालावधीत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.

