पुण्यात पावसाळ्यात चिकुनगुनियाच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून या आजारामुळे होणारी सांधेदुखी दीर्घकाळ टिकू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये शहरात १७५ संशयित रुग्ण आढळले होते.
जुलैमध्ये ही संख्या ३२३ तर ऑगस्टमध्ये आतापर्यंत ३४६ वर पोहोचली आहे. यापैकी जूनमध्ये १२, जुलैमध्ये १२ आणि ऑगस्टमध्ये २० रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते २१ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रात चिकुनगुनियाचे १,०९३ रुग्ण चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. "पुणे महापालिकेकडे चांगल्या निदान सुविधा असून आजाराच्या देखरेखीसाठी तीन सेंटिनल केंद्रे आहेत. चिकुनगुनिया हा सामान्यतः जीवघेणा आजार नाही. आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे नेहमीच्या सामान्य लागण झालेल्या स्वरूपाचे आहेत. प्रयोगशाळेतील सुधारित सुविधांमुळे रुग्णांचे अधिक अचूक निदान करण्यात मदत होत आहे. अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी तात्पुरती ठिकाणे निर्माण होत असल्याने नागरिकांनी मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधकांचा वापर यांसारखी खबरदारी घ्यावी," असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी 'सीविक मिरर'ला सांगितले.
चिकुनगुनिया कशामुळे होतो?
चिकुनगुनिया हा चिकुनगुनिया विषाणूमुळे होणारा आजार आहे. प्रामुख्याने एडीस एजिप्ती आणि एडीस अल्बोपिक्टस या संक्रमित डासांच्या चाव्यामुळे त्याचा प्रसार होतो. हे डास सामान्यतः दिवसा चावतात. घरांच्या परिसरात आणि आजूबाजूला साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक ठरते. त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात चिकुनगुनियाचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
ताप कमी होऊनही इतर लक्षणे कायम असल्यास दुर्लक्ष नको
चिकुनगुनियाची लक्षणे आणि घ्यावयाच्या काळजीबाबत 'सीविक मिरर'ने पुण्यातील डॉक्टरांशी चर्चा केली असता पुण्यातील एका रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ आणि असोसिएट कन्सल्टंट डॉ. प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, चिकुनगुनियामुळे होणारी दीर्घकाळाची सांधेदुखी हा आजार इतर अनेक सामान्य विषाणूजन्य संसर्गांपेक्षा वेगळा ठरवते.
"काही दिवसांत रुग्णांचा ताप उतरू शकतो; मात्र काही रुग्णांमध्ये सांधेदुखी आणि सांध्यांमध्ये कडकपणा अनेक आठवडे किंवा काही महिन्यांपर्यंत राहू शकतो. यामुळे हालचाल आणि दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताप कमी झाल्यानंतरही लक्षणे कायम राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये," असे त्यांनी सांगितले.
चिकुनगुनियास कारणीभूत असलेला एडीस डास दिवसा अधिक सक्रिय
डॉक्टरांच्या मते, चिकुनगुनिया पसरण्यास कारणीभूत ठरणारे एडीस डास दिवसा अधिक सक्रिय असतात. घराभोवती साचलेल्या थोड्याशा पाण्यातही त्यांची पैदास होऊ शकते. पावसाळ्यात कुलर, कुंड्या, टाकून दिलेले टायर, विविध प्रकारचे कंटेनर तसेच बांधकामाची ठिकाणे डासांच्या उत्पत्तीची केंद्रे बनू शकतात.
पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. सम्राट शाह यांनी सांगितले की, संसर्ग झालेल्या रुग्णांना डास चावू नयेत याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण डास अशा रुग्णाच्या शरीरातून विषाणू घेऊन तो इतरांपर्यंत पोहोचवू शकतात. "आजाराच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांनी डासांपासून विशेष काळजी घ्यावी. उपचारांसोबतच घराभोवती साचलेले पाणी हटवणे, डास प्रतिबंधकांचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे घालणे आणि खिडक्या-दारे जाळीने झाकणे किंवा मच्छरदाणीचा वापर करणे यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होऊ शकते," असे शाह यांनी सांगितले.
चिकुनगुनिया आणि डेंगीची सुरुवातीची काही लक्षण सारखीच
डॉक्टरांनी तापावर घरी उपचार करतानाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कारण पावसाळ्यात चिकुनगुनिया आणि डेंगी हे दोन्ही आजार होऊ शकतात आणि सुरुवातीच्या काळात त्यांची काही लक्षणे सारखीच असतात.
पुण्यातील एका रुग्णालयातील कन्सल्टंट फिजिशियन डॉ. अमित तुंगेवार यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात रुग्णालयात डासांमुळे होणाऱ्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. सध्या डेंगीचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत असून चिकुनगुनियाचे रुग्ण मात्र अधूनमधून आढळत आहेत.
"केवळ प्लेटलेट्सची संख्या कमी झाली म्हणून रुग्णांनी घाबरू नये किंवा केवळ प्लेटलेट्सच्या पातळीवरून डेंग्यूची तीव्रता ठरवू नये. रुग्णाची एकूण वैद्यकीय स्थिती, शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि धोक्याची लक्षणे आहेत की नाही, हे रुग्णालयात दाखल करण्याची गरज ठरवण्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे," असे तुंगेवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जास्त किंवा सातत्याने राहणारा ताप, शरीरात पाण्याची कमतरता, तीव्र अंगदुखी किंवा सांधेदुखी आणि लक्षणे वाढत जाणे यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तस्राव, सतत उलट्या होणे, तीव्र पोटदुखी, गुंगी, अस्वस्थता, लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी धोक्याची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह असलेले रुग्ण आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना डासांमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणे दिसल्यास अधिक बारकाईने निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक आहे.
स्वत:हून औषधे घेणे टाळा…
डॉ. शाह यांनी नागरिकांना स्वतःहून औषधे घेणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. "डेंग्यूचा आजार नाकारला जात नाही तोपर्यंत ताप आणि वेदनांसाठी सामान्यतः पॅरासिटामॉलला प्राधान्य दिले जाते. डेंग्यूमध्ये रक्तस्रावाचा धोका असल्याने सुरुवातीच्या काळात अॅस्पिरिन आणि आयबुप्रोफेनसारखी औषधे टाळावीत," असे त्यांनी सांगितले.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी
* पाण्याची भांडी नियमितपणे रिकामी करून स्वच्छ करा.
* साठवलेले पाणी झाकून ठेवा.
* घर आणि कार्यालयाच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाका.
* बांधकामाच्या ठिकाणी तसेच इतर ठिकाणी साचलेले पाणी हटवा.
* विशेषतः पावसाळ्यात परिसर स्वच्छ ठेवा.
* डासांची उत्पत्ती रोखल्यास चिकुनगुनियाचा प्रसार नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
एडीस डासांची उत्पत्ती रोखणे सर्वांत प्रभावी उपाय
आरोग्य तज्ज्ञांनी डासांची उत्पत्ती रोखणे हाच संसर्ग कमी करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासोबतच डासांपासून बचाव करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे. पाण्याची भांडी नियमितपणे रिकामी करून स्वच्छ करणे, साठवलेले पाणी झाकून ठेवणे आणि घर, कार्यालये तसेच बांधकामाच्या ठिकाणी साचलेले पाणी हटवणे यामुळे पावसाळ्यात चिकुनगुनियाचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते.

