Dailyhunt
Colombia : ८० पाणघोड्यांना जीवदान मिळणार? रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांचा कोलंबिया सरकारला प्रस्ताव.

Colombia : ८० पाणघोड्यांना जीवदान मिळणार? रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांचा कोलंबिया सरकारला प्रस्ताव.

पाणघोड्यांना मारण्याऐवजी वनतारा प्रकल्पात पाठवा…

बोगोटा/जामनगर : दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देश सध्या वाढत्या पाणघोड्यांच्या समस्येने त्रस्त झाला आहे. त्यामुळे पाणघोड्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तेथील सरकारने ८० पाणघोड्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.

मात्र, या निर्णयावर रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी चिंता व्यक्त करत एक मानवतावादी पर्याय सुचवला आहे. या पाणघोड्यांना मारण्याऐवजी भारतातील वनतारा प्रकल्पात आणून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव अंबानी यांनी कोलंबिया सरकारला दिला आहे.

कोलंबियातील मॅग्डालेना नदीच्या खोऱ्यात हिप्पोंची संख्या झपाट्याने वाढून ती आता २०० च्या वर गेली आहे. या भागात पाणघोड्यांची शिकार करणारे नैसर्गिक भक्षक नसल्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. याचा परिणाम स्थानिक जैवविविधतेवर होत असून, मानवी सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कोलंबियाच्या सरकारने ८० पाणघोड्यांना ठार मारण्याची परवानगी दिली आहे.

या निष्पाप प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री आयरीन वेलेझ टोरेस यांना पत्र लिहून या पाणघोड्यांना भारतात पाठवण्याची विनंती केली आहे. "हे पाणघोडे बदलत्या परिस्थितीचे बळी आहेत. त्यांना मारण्याऐवजी वैज्ञानिक पद्धतीने भारतात आणून 'वनतारा'मध्ये त्यांचे संगोपन करणे हा उत्तम पर्याय ठरेल," असे अंबानी यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, जामनगर येथील वनतारा प्रकल्पाने या मोहिमेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. अनुभवी पशुवैद्यकांची टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि जैव-सुरक्षा नियमांचे पालन करून हे पुनर्वसन केले जाईल. या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. जोपर्यंत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत पाणघोड्यांना मारण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror