Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FIFA World Cup 2026 : पोर्तुगाल, स्पेनची आगेकूच..

FIFA World Cup 2026 : पोर्तुगाल, स्पेनची आगेकूच..

टोरोंटो : सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोने कारकिर्दीत प्रथमच विश्वचषकाच्या बाद फेरीत गोल केल्यामुळे गाजलेल्या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियावर २-१ने मात केली. या विजयासह पोर्तुगालने अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवले.

स्पेनने सफाईदार विजयाची नोंद करताना ऑस्ट्रियाला ३-०ने नमवून उपांत्यपूर्व फेरी गाठली.

टोरोंटो स्टेडियममध्ये गुरुवारी (दि. २) रात्री झालेली पोर्तुगाल-क्रोएशिया लढत रंगतदार ठरली. पूर्वार्धात दोन्हा संघांनी गोलसाठी प्रयत्न केले. मात्र, यश कोणालाच मिळाले नाही. इव्हान पेरिसिचने हाफ टाइमनंतर गोल करून क्रोएशियालाआघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६८व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टीवर बरोबरी साधणारा गोल केला. ९० मिनिटांच्या निर्धारित वेळेत हा स्कोअर कायम होता. अखेर इंजुरी टाइममध्ये गोंझालो रामोसने हेडरद्वारे गोल करून बरोबरीची कोंडी फोडली आणि पोर्तुगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आता पोर्तुगालसमोर येत्या ७ तारखेला २०१०चा विजेता संघ स्पेनचे आव्हान असेल.

दिएगो जोटाची जर्सी घालून रोनाल्डोची अनोखी श्रद्धांजली

या सामन्याच्या निमित्ताने रोनाल्डोने विश्वचषकाच्या नॉकआउट सामन्यात पहिल्यांदाच गोल केला आहे. त्याचबरोबर रोनाल्डोच्या आणखी एका कृतीने हा सामना संस्मरणीय झाला. त्याने पोर्तुगालचा माजी खेळाडू दिएगो जोटाची जर्सी घालून त्याला श्रद्धांजली वाहिली. जोटाचे एक वर्षापूर्वी आजच्या दिवशी निधन झाले होते. रोनाल्डोची ही कृती पोर्तुगालच्या पाठीराख्यांसह कोट्यवधी फुटबाॅलप्रेमींच्या मनात घर करून गेली.

FIFA World Cup 2026 : बेल्जियमचे अविश्वसनीय पुनरागमन; सेनेगलवर ३-२ असा थरारक विजय…

लुका माॅड्रिचचा अलविदा…

या लढतीत ४१ वर्षीय रोनाल्डो आणि ४० वर्षीय लुका माॅड्रिच हे दिग्गज काय करामत करतात, याकडे जगभरातील फुटबाॅलप्रेमींचे लक्ष होते. आपापल्या संघांचे कर्णधार असलेल्या या दोन्ही खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक आहे. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी बरोबरी साधणारा गोल केला. दुसरीकडे, फुटबाॅलविश्वातील सर्वोत्तम मिडफिल्डरपैकी एक असलेल्या माॅड्रिचने अनेक सुंदर चाली रचल्या. मात्र, त्यांचे गोलमध्ये रुपांतर झाले नाही.

माॅड्रिच हा क्रोएशियाच्या सर्वोत्तम फुटबाॅलपटूंपैकी एक आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसताना त्याने आपल्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये क्रोएशियाला अंतिम फेरी गाठून दिली होती. त्यावेळी फ्रान्सविरुद्ध २-४ अशा फरकाने पराभूत झाल्याने माॅड्रिचच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याच वर्षी मेस्सी आणि रोनाल्डो या दिग्गजांना मागे टाकून माॅड्रिचने 'बॅलाॅन डीओर' आणि 'गोल्डन बाॅल' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांवर नाव कोरले होते. गुरुवारी रात्री पोर्तुगालविरुद्धच्या पराभवानंतर आपल्या लाडक्या संघसहकाऱ्याला निरोप देताना क्रोएशियाचे खेळाडू भावूक झाले होते. रोनाल्डोसह पोर्तुगालच्या खेळाडूंनीही जिगरबाज प्रतिस्पर्धी असलेल्या माॅड्रिचला आदराने अलविदा केला.

FIFA World Cup 2026 : जर्मनीचे गर्वहरण..! इक्वॅडोरने केला चार वेळच्या विश्वविजेत्यांना धूळ चारण्याचा पराक्रम, २-१ने विजय…

स्पेन १६ वर्षांनंतर बाद फेरीत विजयी

गुरुवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात लॉस एंजेलिस स्टेडियममध्ये स्पेनने ऑस्ट्रियाचा ३-० अशा फरकाने सहज धुव्वा उडवला. या विजयासह स्पेनने २०१० नंतर पहिल्यांदाच नॉकआउट सामन्यात विजय मिळवला. विजयी संघातर्फे मिकेल ओयारझाबालने सर्वाधिक दोन गोल केले. पेड्रो पोरोने एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. या विजयामुळे २०१०च्या विश्वविजेतेपदानंतर स्पेनचा संघ २०१४, २०१८ आणि २०२२ अशा तीन स्पर्धांमध्ये साखळी फेरी आणि बाद फेरीच्या पलीकडे मजल मारू शकला नव्हता. यावेळी १६ वर्षांनंतर स्पेनने बाद फेरीची लढत जिंकून आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढवल्या आहेत.

पहिल्या हाफमध्ये सुरुवातीच्या सावधगिरीनंतर स्पेनने हायड्रेशन ब्रेकनंतर आक्रमण तीव्र केले. ३६व्या मिनिटाला मार्क कुकुरेलाच्या पासवर मिकेल ओयारझाबालने गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा स्पर्धेतील त्याचा तिसरा गोल होता.

FIFA World Cup 2026 : जर्मनी (शूट)आऊट, चार वेळच्या विश्वविजेत्यांना पॅराग्वेने दिला ४-३ने धक्का, गोरलक्षक ऑरलँडो गिल ठरला हिरो

दुसऱ्या हाफमध्ये स्पेनने सतत दबाव कायम ठेवला. अॅलेक्स बॅनाने एक उत्कृष्ट चाल रचली आणि त्याचा पास पेड्रो पोरोपर्यंत पोहोचला. पोरोने हेडरने गोल करत आघाडी २-० अशी केली. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिला गोल होता. ८९व्या मिनिटाला कुकुरेलाने पुन्हा उत्कृष्ट पास दिला. त्यावर ओयारझाबालने आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करत विजय निश्चित केला. ओयारझाबालने विश्वचषकात आतापर्यंत चार गोल केले आहेत.

ही लढत स्पेनने मोठ्या गोलफरकाने जिंकली असती. मात्र, ऑस्ट्रियाचा गोलकीपर अलेक्झांडर श्लेगरने सहा उत्कृष्ट बचाव केल्यामुळे स्पेनला केवळ तीनच गोल करता आले. श्लेगरने आपले सर्वस्व पणाला लावून अनेक गोल होण्यापासून रोखले. मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. ऑस्ट्रिया १९९८ नंतर प्रथमच विश्वचषकाच्या नॉकआउट फेरीत पोहोचला होता. त्याने गट फेरीत अल्जेरियाविरुद्ध इंजुरी टाइममध्ये गोल करून ड्रॉ मिळवत पुढील फेरीत स्थान मिळवले होते.

स्पेनच्या गोलरक्षकाची मैदानावर 'विश्रांती'

स्पेनने संपूर्ण सामन्यात चेंडूवर ताबा ठेवला आणि स्पर्धेत आपली सर्वात प्रभावी कामगिरी केली. संघाने सलग चौथ्या सामन्यात आपल्यावर गोल होऊ दिला नाही. ऑस्ट्रियाचा संघ संपूर्ण सामन्यात गोलवर एकही शॉट मारू शकला नाही आणि गोलकीपर उनाई सिमोनला एकही बचाव करावा लागला नाही.

आम्हाला कामगिरीत सुधारणा करावी लागेल….

फुटबाॅलविश्वातील भावी सुपरस्टार मानल्या जात असलेल्या १८ वर्षीय लामिन यामालने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक वेळ मैदानावर घालवला. त्याने स्पेनच्या १०ऑन-टार्गेट शॉट्सपैकी चार मारले. ८५व्या मिनिटाला त्याचा जोरदार शॉट ऑस्ट्रियाचा डिफेंडर डेव्हिड अलाबाने गोललाइनवर अडवला. त्यानंतर काही वेळातच त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आले.

स्पेनचे प्रशिक्षक लुईस डे ला फुएंते म्हणाले, ''मोठ्या संघ गरजेच्या वेळी सर्वोत्तम कामगिरी करतात. आम्ही उत्कृष्ट सामना खेळलो आणि जवळपास परिपूर्णतेच्या जवळ पोहोचलो. तरीही आम्हाला सतत सुधारणा करावी लागेल, कारण पुढे प्रत्येक सामना कठीण असेल.''

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror