दीप्ती शर्मा,संचालक, मल्टिफिट आणि लेक्सिकॉन फिटनेस अकादमी; सर्टिफाइड स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट, प्रसिद्ध पर्सनल ट्रेनर
दरवर्षी जानेवारी महिन्यात जिममध्ये गर्दी वाढते आणि अनेक जण नवीन जिम अन् डाएटची शपथ घेतात.
पण फेब्रुवारी येईपर्यंत त्यातील बहुतांश जण पुन्हा जुन्याच सवयींकडे वळलेले असतात. याचा अर्थ त्यांच्यात इच्छाशक्तीची कमतरता आहे, असे नव्हे. समस्या अशी आहे की बदल करण्याची पद्धतच अपयशाची शक्यता वाढवणारी असते. ही पद्धत म्हणजे एकाच वेळी खूप मोठे बदल करण्याचा प्रयत्न.
लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे एका दिवसात संपूर्ण जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करणे. नवीन आहार, नवीन व्यायाम, नवीन झोपेचे वेळापत्रक हे सगळे एकाच सोमवारपासून सुरू करण्याचा उत्साह असतो. पण हा उत्साह तात्पुरता असतो आणि तो कमी होताच संपूर्ण योजना बारगळते. यापेक्षा अधिक प्रभावी मार्ग म्हणजे अगदी छोट्या बदलांपासून सुरुवात करणे. एक सवय पूर्णपणे अंगवळणी पडली की मग पुढील बदल करणे. ही प्रक्रिया थोडी संथ असली तरी ती दीर्घकाळ टिकते.
फिटनेसच्या सवयी कायम राखण्यासाठी…
* एकाच वेळी दहा मोठे बदल करण्याऐवजी एका छोट्या बदलापासून सुरुवात करा.
* नवीन सवय आधीपासून दररोज करत असलेल्या एखाद्या कृतीशी जोडून घ्या.
* परिपूर्णतेपेक्षा सातत्याला अधिक महत्त्व द्या. एखादा दिवस चुकला म्हणून अपयश मानू नका.
* चांगल्या सवयी सोप्या आणि वाईट सवयी कठीण होतील, असे वातावरण तयार करा.
छोट्या सवयींनी करा सुरुवात; सातत्य महत्वाचे
काही वेळा चूक होणारच, हे आधीच गृहित धरणे महत्त्वाचे आहे. दीर्घकाळ यशस्वी ठरणारे लोक कधीच चुकत नाहीत असे नसते. ते चूक ही केवळ एक घटना मानतात, संपूर्ण प्रयत्नाचे अपयश नाही. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करतात. ''एक दिवस व्यायाम चुकला म्हणजे आता सगळेच सोडून द्यायचे,'' ही सर्वात मोठी चूक आहे.
खरे आरोग्य हे ३० दिवसांच्या आव्हानातून तयार होत नाही. ते दररोज सातत्याने केलेल्या छोट्या, साध्या आणि नियमित कृतींमधून घडते. अशा सवयी कालांतराने आपल्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनतात. त्यामुळे छोट्या पावलांनी सुरुवात करा, संयम ठेवा आणि चांगल्या सवयींना कालांतराने आपले आयुष्य बदलू द्या.
स्मार्ट स्नॅकिंग
स्नॅकिंग म्हणजे जेवणाच्या मधल्या वेळेत काही खाणे, याची प्रतिमा अनेकदा वाईट मानली जाते. वजन वाढणे आणि आरोग्याच्या विविध समस्यांसाठी त्यालाच दोष दिला जातो. मात्र, जेवणाच्या मधल्या वेळेत खाणे ही समस्या नसून आपण काय खातो आणि किती खातो, हा खरा मुद्दा आहे. योग्य पद्धतीने स्नॅकिंग केल्यास शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि पुढील जेवणावेळी अति खाण्याची शक्यता कमी होते.
यामधील मुख्य अडचण म्हणजे सहज उपलब्धता. दुपारच्या सुमारास भूक लागली की हाताशी सर्वप्रथम बिस्कीटे, नमकीन किंवा खालील गाडीवरील वडापाव यांसारखे पर्याय दिसतात. ते पटकन मिळतात, चविष्ट असतात आणि सर्वत्र उपलब्ध असतात. याउलट आरोग्यदायी पर्याय फक्त ते सहज उपलब्ध नसल्यामुळे मागे पडतात. म्हणूनच आरोग्यदायी स्नॅकिंगचा खरा मंत्र इच्छाशक्तीत नसून नियोजनात आहे. चांगले पर्याय सहज उपलब्ध करून दिल्यास योग्य निवड करणे सोपे जाते.
स्नॅक्सचे प्रमाणही महत्त्वाचे आहे. आरोग्यदायी पदार्थही मोठ्या पाकिटातून टीव्ही किंवा मोबाईल पाहत-पाहत नकळत जास्त प्रमाणात खाल्ले जाऊ शकतात. मूठभर सुका मेवा हा उत्तम स्नॅक आहे; पण अर्धा डबा संपवला तर ते एका जेवणाइतक्या कॅलरी देऊ शकते. विचारपूर्वक केलेले स्नॅकिंग म्हणजे फक्त मधल्या वेळचे छोटे जेवण. योग्य पदार्थ जवळ ठेवा, अयोग्य पदार्थ दूर ठेवा आणि प्रमाणावर नियंत्रण ठेवा. मग स्नॅकिंग ही अपराधी वाटण्यासारखी सवय न राहता दैनंदिन जीवनातील आरोग्यदायी भाग बनते.
असे करा स्मार्ट स्नॅकिंग
* फळे, सुका मेवा, भाजलेले हरभरे, मखाणे यांसारखे आरोग्यदायी स्नॅक्स नेहमी जवळ ठेवा.
* केवळ स्वयंपाकघरातच नव्हे तर ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये आणि बॅगमध्येही स्नॅक्स ठेवा.
* प्रोटीन आणि फायबर असलेले स्नॅक्स निवडा. ते जास्त वेळ पोट भरल्याची भावना देतात.
* घरात आणि कार्यालयात जंक फूड सहज नजरेसमोर किंवा हाताशी ठेवू नका.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे दुष्परिणाम
अलीकडच्या काळात आरोग्यविषयक चर्चांमध्ये 'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड' हा शब्द वारंवार ऐकायला मिळतो. हा शब्द थोडा तांत्रिक वाटत असला तरी आधुनिक आहार समजून घेण्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचा अर्थ समजला की अनेक अन्नपदार्थांविषयीचा संभ्रम दूर होतो.
प्रक्रिया केलेले सर्व अन्न वाईट नसते. स्वयंपाक करणे, आंबवणे, धान्य दळणे या सर्व प्रक्रिया आहेत आणि माणूस हजारो वर्षांपासून त्या करत आला आहे. मात्र, अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न वेगळे असते. हे अन्न परिष्कृत घटक आणि विविध रासायनिक पदार्थ वापरून कारखान्यांमध्ये तयार केले जाते. ते स्वस्त, जास्त काळ टिकणारे आणि अतिशय चविष्ट बनवले जाते. पॅकेज्ड स्नॅक्स, साखरयुक्त पेये, इन्स्टंट नूडल्स, अनेक प्रकारची बिस्किटे आणि सुपरमार्केटमधील अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ याच गटात येतात.
या पदार्थांबाबतची चिंता दोन कारणांमुळे आहे. त्यामध्ये अति रिफाइन्ड कार्बोहायड्रेट्स, साखर, मीठ आणि अपायकारक चरबी मोठ्या प्रमाणात असते, मात्र तंतुमय घटक आणि पोषक तत्त्वे कमी असतात. तसेच हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जावेत, यासाठी त्यांची चव तयार केली जाते. कमी प्रमाणात चिप्स खाऊन थांबणे कठीण जाते, हे त्यामुळेच. हे योगायोगाने घडत नाही.
असे मिळवा नियंत्रण…
'अल्ट्रा प्रोसेस्ड फूड' पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही किंवा व्यवहार्यही नाही. त्याऐवजी ते रोजच्या आहाराचा भाग न बनता कधीतरी खाल्ले जाणारे पदार्थ असावेत.
* बहुतेक जेवण संपूर्ण किंवा कमी प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवर आधारित असावे.
* पॅकेज्ड स्नॅक्स आणि साखरयुक्त पेये रोज न घेता अधूनमधून घ्यावीत.
* शक्य तितके घरी स्वयंपाक करा, त्यामुळे अन्नात काय घालायचे यावर तुमचे नियंत्रण राहते.
* अन्नपदार्थांच्या लेबलवरील घटक वाचा. त्यात खूप लांबलचक आणि अपरिचित घटकांची यादी असल्यास सावध राहा.
नैसर्गिक अन्नाला द्या प्राधान्य
एक सोपा नियम म्हणजे, जे अन्न नैसर्गिक स्वरूपाच्या जवळ आहे किंवा पारंपरिक पद्धतीने तयार केले आहे, त्याला प्राधान्य द्या. डाळी, भाज्या, फळे, धान्य, दही यांसारखे पदार्थ आपल्या आजी-आजोबांनाही परिचित होते. कारखान्यात तयार झालेल्या आकर्षक पॅकेजिंगमधील पदार्थांपेक्षा असे नैसर्गिक अन्न अधिक चांगले ठरते. हा कठोर नियम नसून दैनंदिन निवडीसाठी योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक आहे.

