Dailyhunt
Health Watch : 'एमव्हिडी' वेदना स्विच ऑफ करणारी शस्त्रक्रिया.

Health Watch : 'एमव्हिडी' वेदना स्विच ऑफ करणारी शस्त्रक्रिया.

ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, स्पॅझमवर प्रभावी उपाय; तात्पुरत्या उपचारांऐवजी कायमस्वरूपी दिलासा

जिगर हिंडोचा

अनेक लोकांसाठी चेहऱ्यावर होणाऱ्या तीव्र वेदना आणि अनियंत्रित आकडी (स्पॅझम्स) या केवळ वैद्यकीय समस्या नसून, त्या त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवतात.

खाणे, बोलणे, हसणे किंवा अगदी हलकी झुळूक जाणवणे देखील असह्य होऊन बसते. 'ट्रायजेमिनल न्यूराल्जिया', 'हेमिफेशिअल स्पाझम' आणि 'ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया' यांसारख्या आजारांचे अनेकदा चुकीचे निदान केले जाते. अनेक प्रकरणांमध्ये, उपचार केवळ तात्पुरत्या आरामावर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे मूळ समस्या वाढतच जाते. मात्र, एक अशी शस्त्रक्रिया आहे जी केवळ लक्षणांवर उपचार न करता या आजारांच्या मूळ कारणावर घाला घालते. या प्रक्रियेला 'मायक्रोव्हस्कुलर डीकम्प्रेशन' म्हणतात आणि अनेक रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया सामान्य जीवनात परतण्याचा मार्ग ठरली आहे.

एमव्हिडी म्हणजे नक्की काय?

सह्याद्री हॉस्पिटल (डेक्कन जिमखाना) येथील मेंदूविकार तज्ज्ञ आणि एमव्हिडी व स्कल-बेस सर्जरी प्रोग्राम'चे संचालक डॉ. जयदेव पंचवाघ म्हणतात की, "एमव्हिडी ही मेंदूवरील एक विशेष शस्त्रक्रिया आहे. जगभरातील निवडक तज्ज्ञच ही शस्त्रक्रिया करतात. रक्तवाहिनीमुळे मज्जातंतूवर येणारा दबाव कमी करणे, हा याचा मुख्य उद्देश आहे. काही व्यक्तींमध्ये मेंदूतील विशिष्ट मज्जातंतू (जे चेहऱ्याच्या हालचाली आणि संवेदना नियंत्रित करतात) हे रक्तवाहिन्यांच्या अगदी जवळ असतात. कधी कधी ही रक्तवाहिनी त्या मज्जातंतूवर सतत दाब टाकते. प्रत्येक हृदयाच्या ठोक्याबरोबर हा दाब वाढतो आणि कालांतराने मज्जातंतूची संरक्षक आवरण (मायलिन) खराब होते. त्यामुळे असामान्य सिग्नल निर्माण होतात.

या आजारांची लक्षणे काय आहेत?

डॉक्टरांच्या मते, या आजारांच्या तीव्र लक्षणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

ट्रायजेमिनल न्यूराल्जिया : चेहऱ्यावर अचानक विजेचा धक्का लागल्यासारख्या तीव्र वेदना होणे.

हेमिफेशिअल स्पाझम : चेहऱ्याचे स्नायू वारंवार आणि अनियंत्रितपणे थरथरणे.

ग्लोसोफॅरिंजियल न्यूराल्जिया : घसा आणि कानात तीव्र वेदना होणे.

एमव्हिडी शस्त्रक्रियेद्वारे या समस्येवर उपाय केला जातो. या प्रक्रियेत कानामागे छोटासा छेद करून शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्टर रक्तवाहिनीला हलक्या हाताने मज्जातंतूपासून दूर करतात आणि त्यांच्या मध्ये एक लहान, मऊ कुशन ठेवतात. त्यामुळे मज्जातंतूवरील ताण कमी होतो आणि तो हळूहळू बरा होऊ लागतो.

'एमव्हिडी'बाबत रुग्णांमध्ये जागरूकतेचा अभाव

एमव्हिडी प्रभावी असूनही, अनेक रुग्णांना याबद्दल वेळेवर माहिती मिळत नाही. ते वर्षानुवर्षे औषधांचे डोस आणि तात्पुरते उपचार घेत राहतात. वायसीएम रुग्णालयातील न्यूरोसर्जरी विभाग प्रमुख डॉ. अमित वाघ म्हणाले की, "अनेक रुग्ण शस्त्रक्रियेला घाबरतात किंवा त्यांना चुकीचे मार्गदर्शन केले जाते. एमव्हिडी हाच मज्जातंतू आणि रक्तवाहिनीमधील गुंता सोडवण्याचा एकमेव पर्याय आहे. एका ६० वर्षीय महिलेने २० वर्षे केवळ वरण-भात खाल्ला, कारण चपाती चावल्यामुळे तिला असह्य वेदना व्हायच्या. शस्त्रक्रियेनंतर त्या आता नीट जेवू शकतात. एका ज्येष्ठ नागरिकाला तो डोळा मारत आहे असे समजून सार्वजनिक ठिकाणी मारहाण झाली होती. अशा प्रकारच्या सामाजिक समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागते. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे आणि खाजगी रुग्णालयांमध्ये सरकारी आरोग्य योजनांतर्गत (उदा. महात्मा फुले जन आरोग्य योजना) देखील उपलब्ध आहे."

हा आजार कायमस्वरूपी कसा बरा होतो?

औषधे, इंजेक्शन किंवा मज्जातंतू नष्ट करणाऱ्या प्रक्रिया केवळ लक्षणे कमी करण्याचा प्रयत्न एमव्हिडी मात्र थेट मूळ कारणावर उपचार करते. मज्जातंतूवरील दबाव कमी करून त्याची कार्यक्षमता पुन्हा सामान्य करते. महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेत मज्जातंतू नष्ट केला जात नाही, त्यामुळे संवेदना आणि हालचाल कायम राहतात. काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर त्वरित आराम मिळतो, तर काहींमध्ये काही आठवड्यांनंतर सुधारणा दिसते.

'अदृश्य' आजाराचे भीषण परिणाम

हे आजार बाहेरून दिसत नाहीत, पण वेदना अत्यंत तीव्र असतात. ट्रायजेमिनल न्यूरॅल्जियाला 'सुसाइड डिसीज' असेही म्हटले जाते, कारण वेदना असह्य असतात. दात घासणे किंवा बोलणे यासारख्या साध्या गोष्टींनीही वेदना सुरू होतात. हेमीफेशियल स्पॅझम वेदनादायक नसला तरी अत्यंत त्रासदायक असतो. चेहऱ्याच्या एका बाजूला सतत आकडी येत राहते, ज्यामुळे सामाजिक गैरसमज आणि लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते.

२००७ पासून मी ट्रायजेमिनल न्यूराल्जियाने त्रस्त होते. २०११ मध्ये एमव्हीडी शस्त्रक्रिया झाल्यापासून मला एकदाही त्रास झालेला नाही. मला वाटते की मी ही शस्त्रक्रिया आधीच करायला हवी होती.
- अनुराधा जयवंत, रुग्ण

…आणि मी पुन्हा सामान्य आयुष्य जगू लागले

पुण्यातील वर्षा अत्रे, ज्यांना हेमिफेशिअल स्पाझमचा त्रास होता, त्या सांगतात, "२०१० मध्ये जेव्हा पहिल्यांदा माझा डोळा थरथरू लागला, तेव्हा मला वाटले हे काही गंभीर नसेल. पण काही दिवसांत माझा संपूर्ण चेहरा एका बाजूला ओढला गेला आणि मी नीट बोलूही शकत नव्हते. मी होमिओपॅथी, आयुर्वेद आणि बोटॉक्स इंजेक्शन्सही घेतले, पण कशानेही कायमस्वरूपी आराम मिळाला नाही. २०२१ मध्ये मी एमव्हिडी शस्त्रक्रिया केली आणि तेव्हापासून मी पुन्हा सामान्य आयुष्य जगू लागले आहे. आता मी लोकांशी आत्मविश्वासाने बोलू शकते."

"डॉक्टरांनी रुग्णांना 'एमव्हिडी'बद्दल माहिती देणे आवश्यक आहे. शस्त्रक्रिया करायची की नाही हा रुग्णाचा निर्णय असला, तरी त्यांना या पर्यायाची माहिती मिळणे हा त्यांचा हक्क आहे."
- डॉ. जयदेव पंचवाघ, न्यूरो सर्जन

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror