- तनिषा ज. कुंदेन
पुण्यात वाढते तापमान, धूळ आणि शहरभर मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामांचा आता नागरिकांच्या डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षांत डोळ्यांचा कोरडेपणा, लालसरपणा, अॅलर्जी आणि संसर्गाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, शहरातील नेत्रतज्ज्ञांकडे अशा रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
विशेषतः लहान मुले, दुचाकीस्वार, मजूर आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी या समस्यांना सर्वाधिक बळी पडत आहेत.
पुण्यातील नेत्रतज्ज्ञांच्या मते, बदलते हवामान, वाढते प्रदूषण, स्क्रीन (मोबाईल, लॅपटॉप) समोरचा वाढलेला वेळ आणि उन्हात दीर्घकाळ राहणे ही उन्हाळ्यातील डोळ्यांच्या समस्यांची प्रमुख कारणे ठरत आहेत.
बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश शितोळे यांनी सांगितले की, "आमच्याकडे दररोज सुमारे १५० ते २०० रुग्ण तपासणीसाठी येतात. त्यापैकी जवळपास २० रुग्ण हे विशेषतः उन्हाळ्यातील डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त असतात. दरवर्षी अशा रुग्णांच्या संख्येत सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होत आहे. पुण्यातील हवामानातील बदल आणि वाढती बांधकामे यामुळे नागरिकांचा धूळ, सिमेंटचे कण आणि प्रदूषणाशी अधिक संपर्क येत आहे."
'ड्राय आय डिसीज' आणि ॲलर्जीच्या समस्येत वाढ
डॉक्टरांच्या मते, उन्हाळ्यात 'ड्राय आय डिसीज' (डोळे कोरडे पडणे) हा सर्वात सामान्य आजार म्हणून समोर आला आहे. जास्त तापमान आणि उष्ण वाऱ्यांमुळे डोळ्यांमधील पाण्याचा थर (टिअर फिल्म) वेगाने सुकतो. यामुळे डोळ्यांची जळजळ, लालसर होणे आणि डोळ्यांच्या पृष्ठभागावर सूज येते. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. निशा चव्हाण यांनी स्पष्ट केले की, अनेक रुग्ण सुरुवातीला डोळ्यांच्या कोरडेपणाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा समस्या गंभीर होते, तेव्हाच डॉक्टरांकडे येतात.
डोळ्यातून पाणी येणे कोरडेपणाचेच लक्षण
उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होणे, डोळे लाल होणे, डोळ्यात काहीतरी टोचल्यासारखे वाटणे (फॉरेन बॉडी सेन्सेशन), मधूनमधून अंधुक दिसणे, डोळ्यातून सतत पाणी येणे आणि डोळ्यांवर थकवा येणे ही लक्षणे सामान्य झाली आहेत. "अनेक लोकांना हे समजत नाही की डोळ्यातून पाणी येणे हे देखील डोळे कोरडे पडण्याचेच एक लक्षण असू शकते. जळजळ झाल्यामुळे डोळे संरक्षणात्मक प्रतिसाद म्हणून पाणी तयार करतात, परंतु हे पाणी डोळ्यांना आवश्यक वंगण (लुब्रिकेशन) पुरवू शकत नाही. वातानुकूलित वातावरणात काम करणे, सतत स्क्रीनकडे पाहणे आणि शरीरात पाण्याची कमतरता असणे यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत आहे; विशेषतः पुण्यातील आयटी क्षेत्रातील मोठ्या नोकरदार वर्गात ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
बांधकामाची धूळ आणि वाहतुकीचा विळखा
पुण्यात सुरू असलेल्या बांधकाम आणि रस्त्यांच्या कामांमुळे हवेत धूळ, धूर आणि सिमेंटचे कण वाढले आहेत. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, अॅलर्जी आणि 'कंजंक्टिव्हायटिस'च्या तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विशेषतः दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि आयटी कर्मचारी अधिक धोक्यात आहेत. धूळ आणि वाहतूक कोंडीतून प्रवास करून थेट एसी कार्यालयात जाण्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढत आहे. तसेच बांधकाम मजूर, डिलिव्हरी बॉईज, ट्रॅफिक पोलीस आणि शेतकरी यांनाही कडक ऊन, उष्ण वारे आणि प्रदूषणामुळे डोळ्यांच्या आजारांचा धोका अधिक असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
उन्हाळी सुटीत मुलांमध्येही वाढल्या तक्रारी
शाळांना सुटी लागल्यानंतर लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या अॅलर्जी आणि संसर्गाच्या तक्रारी वाढल्या आहेत. मुले जास्त वेळ मैदानात खेळतात आणि अस्वच्छ हातांनी डोळे चोळतात, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या मते, पोहण्याच्या तलावांमधील क्लोरीनयुक्त पाणी आणि अस्वच्छ स्विमिंग पूलमुळे डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढत आहे. अस्वच्छ स्विमिंग पूलमुळे डोळ्यांना संसर्ग होऊ शकतो. जास्त क्लोरीनमुळे लालसरपणा आणि जळजळ वाढते. कॉन्टॅक्ट लेन्स लावून पोहणे अधिक धोकादायक ठरू शकते.
"उन्हाळ्याशी संबंधित डोळ्यांच्या बहुतांश समस्या या सौम्य जळजळ किंवा कोरडेपणाने सुरू होतात, परंतु लक्षणे सतत जाणवत राहिल्यास त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. वेळेवर घेतलेली खबरदारी आणि उपचार गंभीर गुंतागुंत टाळू शकतात." - डॉ. निशा चव्हाण, नेत्ररोग तज्ज्ञ
स्क्रीन टाइममुळे वाढतोय डोळ्यांवरील ताण
डिजिटल उपकरणांमुळे डोळ्यांवर येणारा ताण (डिजिटल आय स्ट्रेन) उन्हाळ्यात समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे लोक पापण्या कमी लवतात, ज्यामुळे डोळ्यांतील पाणी वेगाने सुकते, विशेषतः उष्ण आणि एसी वातावरणात हा त्रास जास्त होतो. स्क्रीनचा सततचा वापर सर्व वयोगटातील ड्राय आईजची लक्षणे वाढवत आहे. यासाठी लोकांनी जाणीवपूर्वक पापण्यांची उघडझाप केली पाहिजे आणि डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी '२०-२०-२०' नियम पाळण्याचा सल्ला दिला आहे. या नियमानुसार, दर २० मिनिटांनी २० सेकंदांसाठी २० फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहावे.
लक्षणे कायम राहिल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉक्टरांनी स्वतःच्या मनाने वैद्यकीय सल्ल्याशिवाय मेडिकलमधून ड्रॉप्स आणून डोळ्यात टाकण्यास सक्त मनाई केली आहे; विशेषतः स्टिरॉइड्स असलेल्या ड्रॉप्समुळे संसर्ग अधिक गंभीर होऊ शकतो. उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, दिवसातून अनेक वेळा थंड पाण्याने चेहरा व डोळे धुणे, घराबाहेर पडताना सनग्लासेस, हेल्मेट आणि टोपीचा वापर करणे तसेच दुपारच्या कडक उन्हात आणि धुळीत जाणे टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु, डोळे सतत लाल राहणे, वेदना होणे, डोळ्यातून चिकट पाणी/स्त्राव येणे, प्रकाशाचा त्रास होणे किंवा अंधुक दिसणे यांसारख्या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. डोळ्यांत कोरडेपणा, लालसरपणा, सूज किंवा वेदना जाणवल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
"जेव्हा रुग्णांना डोळे सुकणे, लाल होणे, जळजळ किंवा सूज येणे यांसारखी लक्षणे जाणवतील, तेव्हा त्यांनी घरगुती किंवा नेहमीच्या डॉक्टरांकडे न जाता थेट नेत्ररोग तज्ज्ञांचा (आय स्पेशालिस्ट) सल्ला घ्यावा." - डॉ. शितोळे, सहयोगी प्राध्यापक, बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय,नेत्ररोग विभाग
डोळ्यांच्या आजारांची लक्षणे :
डोळ्यांची जळजळ होणे.
डोळे सतत लाल होणे.
डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे किंवा टोचल्यासारखे वाटणे.
मधूनमधून अंधुक किंवा अस्पष्ट दिसणे.
डोळ्यातून सतत पाणी येणे.
डोळ्यांवर प्रचंड थकवा जाणवणे.
प्रतिबंधात्मक उपाय
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्या.
दिवसातून वारंवार थंड पाण्याने चेहरा आणि डोळे स्वच्छ धुणे.
घराबाहेर पडताना सनग्लासेस, हेल्मेट आणि टोपीचा वापर करणे.
दुपारच्या कडक उन्हात, तीव्र सूर्यप्रकाशात आणि धुळीच्या वातावरणात जाणे टाळणे.

