बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खान हे इंडस्ट्रीतील एक 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जायचे. परंतु, १४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुमारे चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांचे २००० साली लग्न केले होते.
याच वर्षी हृतिकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २००६ मध्ये त्यांना हृहान आणि २००९ मध्ये हृधान ही मुले झाली. १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला होता.
हृतिक आणि सुझैन यांनी २०१४ मध्ये अधिकृतपणे घटस्फोट घेतला, तरीही आजतागायत ते एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे नेमके कारण कधीही समोर आले नाही. दरम्यान, हृतिक आणि सुझैन यांचा जेव्हा घटस्फोट झाला, तेव्हा तिने हृतिककडे ४०० कोटी रुपयांच्या पोटगीची मागणी केल्याचा दावा केला जात होता. परंतु, पोटगीसंदर्भातील या दाव्यांना अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिला नव्हता.
अशातच, हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील आजवरचा सर्वांत महागडा घटस्फोट असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फराह खानने बहीण सुझैन आणि हृतिक रोशनच्या घटस्फोटावर सविस्तर भाष्य केले. ती म्हणाली, "त्यांच्या या निर्णयाचा आम्हा सर्वांनाच धक्का बसला होता. त्यावेळी खूप गोंधळ उडाला होता. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांची वेगवेगळी मते होती, पण मला वाटते की त्या दोघांनीही ही संपूर्ण परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे हाताळली." यादरम्यान, सुझैनच्या बहिणीने एक मोठा खुलासा करत स्पष्ट केले की, सुझैन खानने घटस्फोटाच्या वेळी हृतिक रोशनकडून पोटगी म्हणून एकही रुपया घेतला नाही. पुढे बोलताना ती म्हणाली, "मला एक गोष्ट प्रकर्षाने स्पष्ट करायची आहे की, माझ्या बहिणीने ४०० कोटी रुपयांची पोटगी घेतलेली नाही. जेव्हा मी ऑनलाइन अशा खोट्या बातम्या पाहते, तेव्हा मला खूप वाईट वाटते. लोक म्हणतात की, ४०० कोटी दिले गेले आणि सुझैन श्रीमंत झाली… पण हे पूर्णपणे खोटे आहे. माझ्या बहिणीने कोणाकडूनही काहीही घेतलेले नाही."
Make Civic Mirror My Trusted Source
"आमच्यासाठी पैशांपेक्षा नाती अधिक महत्त्वाची आहेत. म्हणूनच माझ्या बहिणीने कोणतीही गोष्ट गृहीत धरली नाही. सुझैनचे आजही हृतिक आणि तिच्या माजी सासू-सासऱ्यांसोबत खूप चांगले व आपुलकीचे नाते आहे. ते सर्वजण तिच्यावर आजही मनापासून प्रेम करतात. ती पैशांसाठी लग्न करणारी स्त्री नाही, ती खूप सुसंस्कृत आहे. हृतिकसुद्धा एक अत्यंत उत्तम माणूस आहे. दुर्दैवाने त्यांचे नाते टिकले नाही, पण निव्वळ प्रसिद्धीसाठी कोणीच आपला संसार उद्ध्वस्त करत नाही. ती 'गोल्ड डिगर' नाही. यामध्ये पोटगीचा कोणताही प्रश्नच नव्हता. हे पसरवले जाणारे वृत्त चुकीचे आणि पूर्णपणे खोटे आहे."
फराहने पुढे सांगितले की, तिने सुझैनला या सर्व निरर्थक चर्चांवर जाहीर प्रतिक्रिया देण्यास सांगितले होते, पण सुझैनने नेहमीच त्याला नकार दिला. फराह म्हणाली, "मी तिला विचारले होते की, 'तू या सगळ्या उलटसुलट चर्चांवर उत्तर का देत नाहीस?' त्यावर ती म्हणाली, 'लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, याची मला अजिबात पर्वा नाही.' मला वाटते आपण सगळेच कुटुंब म्हणून असेच आहोत. मला जे करायचे आहे ते मी करते. जोपर्यंत तुम्ही माझ्या आयुष्यात काही मोलाची भर घालत नाही, तोपर्यंत मी काय करते याने तुम्हाला काही फरक पडायला नको आणि तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याने मलाही काही फरक पडत नाही."

