IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या वृत्ताला दुजोरा दिला.
पंतने स्वतः कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती, जी संघ व्यवस्थापनाने तात्काळ मान्य केली आहे.
पंतने सोडले लखनऊचे कर्णधारपद
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रँचायझीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ऋषभने पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि संघाने त्याच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. फ्रँचायझीचे क्रिकेट संचालक टॉम मूडी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पंतने स्वतः व्यवस्थापनाकडे ही विनंती केली होती.
दोन हंगामात प्लेऑफचे तिकीट मिळवून देण्यात अपयश
ऋषभ पंतला आयपीएल २०२५ च्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीवर खरेदी केले होते. फ्रँचायझीला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु कर्णधार म्हणून त्याचा कार्यकाळ यशस्वी ठरला नाही. आयपीएल २०२६ मध्ये लखनऊची कामगिरी अत्यंत खराब राहिली. संघ १४ सामन्यांपैकी केवळ ४ विजय मिळवू शकला आणि गुणतालिकेत तळाला राहिला. याआधी आयपीएल २०२५ मध्येही संघाने १४ पैकी केवळ ६ सामने जिंकले होते. अशा प्रकारे पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊने एकूण २८ सामन्यांत फक्त १० विजय नोंदवले.
फलंदाजीतही निराशा
कर्णधारपदासोबतच ऋषभ पंतची वैयक्तिक कामगिरीही खालावली. आयपीएल २०२५ मध्ये त्याने १४ सामन्यांत २६९ धावा केल्या होत्या, तर आयपीएल २०२६ मध्ये त्याच्या बॅटमधून ३१२ धावा निघाल्या. मात्र, त्याच्या खेळीत सातत्याचा अभाव स्पष्टपणे दिसून आला.

