Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IPL 2026 (GT vs RR) : गुजरात तिसऱ्यांदा IPL फायनलमध्ये; क्वालिफायर-२ च्या लढतीत राजस्थानचा सात गडी राखून केला पराभव.

IPL 2026 (GT vs RR) : गुजरात तिसऱ्यांदा IPL फायनलमध्ये; क्वालिफायर-२ च्या लढतीत राजस्थानचा सात गडी राखून केला पराभव.

IPL 2026 (GT vs RR, Highlights) : कर्णधार शुभमन गिलची कर्णधारपदाला साजेशी खेळी आणि साई सुदर्शनसोबत पहिल्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीच्या जोरावर गुजरात टायटन्सने क्वालिफायर-२ च्या लढतीत राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला.

या विजयासह गुजरातने आयपीएल २०२६ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. राजस्थानने वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २१४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरातने १८.४ षटकांत ३ बाद २१९ धावा करून विजय मिळवला. अशा प्रकारे राजस्थानचा या हंगामातील प्रवास क्वालिफायर-२ मध्येच संपुष्टात आला आहे.

गुजरात टायटन्सने अशा प्रकारे तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी संघाने सन २०२२ (विजेता) आणि २०२३ (उपविजेता) मध्ये जेतेपदाचा सामना खेळला होता. आता ३१ मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) शी होईल. या सामन्यात आरसीबी जिथे जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल, तर गुजरात दुसऱ्यांदा ट्रॉफी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. गुजरातसाठी सुदर्शन-गिल व्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरने १६ धावा केल्या, तर राहुल तेवतिया १७ आणि जोस बटलर ९ धावांवर नाबाद राहिले. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर आणि बृजेश शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

IPL 2026 (RCB vs GT) : आरसीबी पाचव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये; क्वालिफायर-१ मध्ये गुजरातचा ९२ धावांनी उडवला धुव्वा….

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यांनी भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये कोणत्याही विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. गिल आणि सुदर्शनने चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) मायकेल हसी आणि मुरली विजय यांचा १५ वर्ष जुना विक्रम मोडला. हसी आणि विजय यांनी २०११ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या फायनलमध्ये १५९ धावांची भागीदारी केली होती, जी आतापर्यंत आयपीएल प्लेऑफमधील सर्वोच्च भागीदारी होती; मात्र गिल-सुदर्शन जोडीने हा विक्रम मोडीत काढला.

इतकेच नाही तर, गिल-सुदर्शन यांच्यात ११ व्यांदा शतकी भागीदारी झाली असून, पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक वेळा केलेली ही भागीदारी आहे. या जोडीने ख्रिस गेल आणि विराट कोहली, बाबर आझम-मोहम्मद रिझवान आणि एबी डिव्हिलियर्स-कोहली यांना मागे टाकले आहे, ज्यांनी प्रत्येकी १० वेळा शतकी भागीदारी केली आहे.

साई सुदर्शन चांगली फलंदाजी करत होता, मात्र या सामन्यातही तो 'हिट विकेट' होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यापूर्वी, आरसीबी विरुद्धच्या क्वालिफायर-१ सामन्यातही तो अशाच प्रकारे बाद झाला होता. दोन्ही वेळा सुदर्शनने शॉट खेळला आणि चेंडू सीमापार गेला, पण त्याच वेळी त्याची बॅट स्टंपला लागल्याने त्याला बाद घोषित करण्यात आले.

सुदर्शनने ३२ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या.सुदर्शनने आयपीएलच्या या हंगामात नव्यांदा ५०+ धावांची खेळी केली आहे. तसेच त्याने या हंगामात आपले ७०० धावाही पूर्ण केल्या आहेत. आयपीएलच्या दोन वेगवेगळ्या हंगामात ७०० पेक्षा जास्त धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. सुदर्शनने २०२५ मध्येही ७०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्याच्याआधी ख्रिस गेल (२०१२, २०१३), विराट कोहली (२०१६, २०२४) आणि शुभमन गिल (२०२३, २०२६) यांनी हा पराक्रम केला आहे.

IPL 2026 : फलंदाजीत देशी तर गोलंदाजीत विदेशी खेळाडू ठरले अव्वल….

गिलने या सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी खेळली आणि तो शतक झळकावण्यात यशस्वी ठरला. गिलने ४७ चेंडूंमध्ये आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पाचवे शतक पूर्ण केले. गिल आता आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा सहावा फलंदाज बनला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक शतके नोंदवण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, ज्याने नऊ शतके झळकावली आहेत.

कर्णधार म्हणून गिलचे हे दुसरे शतक होते आणि कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. कोहलीने कर्णधार म्हणून पाच आणि केएल राहुलने तीन शतके झळकावली आहेत. शतक पूर्ण केल्यानंतर मात्र गिल खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि ५३ चेंडूंत १५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १०४ धावा काढून बाद झाला.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानसाठी यशस्वी जयस्वाल आणि सूर्यवंशी जोडीने डावाची सुरुवात केली. मात्र, राजस्थानची सुरुवात निराशाजनक झाली आणि संघाने पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वालची विकेट गमावली. मोहम्मद सिराजने यशस्वीला बाद केले, तो केवळ एक धाव काढून माघारी परतला. त्यानंतर कगिसो रबाडाने ध्रुव जुरेलला बाद केले, जो केवळ सात धावा करू शकला. अशा प्रकारे राजस्थानने पॉवरप्लेमध्येच दोन महत्त्वाचे गडी गमावले.

सुरुवातीचे धक्के बसल्यानंतर राजस्थानने आपली रणनीती बदलली आणि कर्णधार रियान परागच्या ऐवजी रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. जडेजा एकीकडे आक्रमक फलंदाजी करत होता, तर दुसरीकडे सूर्यवंशीने दुसऱ्या टोकाकडून त्याला मोलाची साथ दिली. या दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली, पण त्याच वेळी जडेजा 'रिटायर्ड हर्ट' होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर रियान मैदानात उतरला, मात्र जेसन होल्डरने त्याला बाद केले; रियान केवळ ११ धावा करू शकला. त्यानंतर होल्डरने दासून शनाका (३) आणि प्रसिद्ध कृष्णाने जोफ्रा आर्चरला (७) बाद केले. पाच गडी बाद झाल्यानंतर जडेजा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात आला. वैभव आणि जडेजाने धडाकेबाज फलंदाजी केली, परंतु कगिसो रबाडाने सूर्यवंशीला बाद करून ही भागीदारी तोडली. सूर्यवंशी आणि जडेजा यांच्यात ६५ चेंडूंत १२७ धावांची स्फोटक भागीदारी झाली.

IPL 2026 : चालू हंगामात खराब कामगिरी, ऋषभ पंतने घेतला मोठा निर्णय….

वैभवने एका बाजूने डाव सावरून धरला आणि एलिमिनेटरनंतर या सामन्यातही दमदार कामगिरी केली. मात्र, सलग दुसऱ्या सामन्यात त्याचे शतक हुकले आणि ४७ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ९६ धावा काढून तो बाद झाला. वैभव या हंगामात तिसऱ्यांदा 'नर्व्हस नाईन्टीज'चा (९० ते ९९ धावांच्या दरम्यान बाद होणे) शिकार झाला आणि त्याचे शतक हुकले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात वैभव ९७ धावांवर बाद झाला होता आणि आता या सामन्यातही तो शतकापासून केवळ चार धावा दूर राहिला. एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक वेळा शतकाने हुलकावणी दिलेल्या फलंदाजांच्या यादीत आता वैभवचा समावेश झाला आहे. वैभवच्या आधी २०१४ मध्ये ग्लेन मॅक्सवेल देखील तीन वेळा शतकापासून मुकला होता.

वैभव आणि जडेजालगतच राजस्थानसाठी डोनोवान फरेरा याने अंत्यत स्फोटक फलंदाजी केली. फरेराने अवघ्या ११ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावा केल्या, ज्यामुळे संघाचा धावसंख्या २०० च्या पार पोहोचली. २० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या राशिद खान च्या एकाच षटकात फरेराने २७ धावा वसूल केल्या. आयपीएल प्लेऑफमध्ये एखाद्या फिरकीपटूसाठी हे संयुक्तपणे सर्वात महागडे षटक ठरले आहे. यापूर्वी २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या रवी बिश्नोईने आरसीबी विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात इतक्याच धावा दिल्या होत्या.

फरेराव्यतिरिक्त जडेजा ३५ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा काढून नाबाद राहिला. गुजरातसाठी कगिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror