दुखापतीनंतर १०० टक्के तंदुरुस्त झालेला वेगवान गोलंदाज मयंक यादव करत आहे आक्रमकता आणि अचूकतेवर लक्ष केंद्रित
लखनौ | लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मयंक यादव आयपीएलच्या दोन हंगामात दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
मात्र, या हंगामात तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन खेळत आहे. दुखापतीतून मी पूर्णपणे सावरलो असून १०० टक्के फिट आहे, असे त्याने सांगितले.
या आयपीएलमध्ये लखनौ संघाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. इकाना स्टेडियम या होम ग्राउंडवर होणाऱ्या सामन्यासाठी त्याने कसून सराव केला. तो नेटमध्ये सीमसोबत स्विंग गोलंदाजीही प्रभावीपणे करीत असल्याचे दिसून आले.
लखनौ सुपर जायंट्सने शोधून काढलेल्या या वेगान गोलंदाजाची सर्वत्र चर्चा होऊ लागली. मात्र, २०२४चे आयपीएल सुरू असताना तो मध्येच दुखापग्रस्त झाला. यामुळे तो संपूर्ण स्पर्धा खेळू शकला नाही. मागील वर्षीही दुखापतीतून सावरला नसल्याने तो स्पर्धेत खेळू शकला नाही. आता मात्र आपण खेळण्यास सज्ज असल्याचे मयंकने सांगितले. दुसरीकडे, संघ व्यवस्थापन मयंकबाबबत धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नसून योग्य ती सावधगिरी बाळगूनच त्याला खेळवणार असल्याचे कळते.
आमच्या संघातील खेळाडूंमधील समन्वय खूप चांगला आहे. प्रत्येक सामन्यात संपूर्ण संघ सकारात्मक दृष्टिकोन घेऊन मैदानात उतरेल. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. मध्यक्रमातील फलंदाजांसोबत फिरकी गोलंदाजी विभागातही संघ चांगली कामगिरी करेल. आम्ही स्पर्धेत एक संघ म्हणून उत्कृष्ट कामगिरी करू, असा विश्वास मयंकने व्यक्त केला.
'स्टेन'गन आदर्श
मयंक म्हणाला, ''जेव्हा मी फिटनेसच्या समस्येशी झुंजत होतो, तेव्हा जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांनी मदत केली. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी लयीत येऊ शकलो.'' दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा २३ वर्षीय मयंकचा आदर्श आहे. ''डेल स्टेनची अचूकता आणि वेग जबरदस्त आहे. त्याची हीच गोष्ट मला गोलंदाज म्हणून आकर्षित करते. त्याची आत्मविश्वासपूर्ण आक्रमकता मला आवडते. मला स्टेनप्रमाणे मैदानावर आक्रमक आणि अचूक गोलंदाजी करायची आहे,'' असेही मयंकने आवर्जून सांगितले.
२०२४ : पदार्पणाच्या आयपीएलमध्ये टाकला मोसमातील सर्वांत वेगवान चेंडू
मयंकने २०२४च्या आयपीएलमध्ये पदार्पण केले. या हंगामात त्याने सातत्याने दीडशे किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी करीत क्रिकेटविश्वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. या मोसमात त्याने १५६.७ किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. २०२४च्या आयपीएलमधील तो सर्वात वेगवान चेंडू ठरला.

