IPL 2026 (MI vs DC) | दिल्ली कॅपिटल्सने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सहा विकेटने धुव्वा उडवला. अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी (दि. ४) झालेल्या या सामन्यात प्रथम दिल्लीने मुंबईला ६ बाद १६२ धावांवर रोखले.
मुकेशकुमारने दोन तर लुंगी एन्गिडी, अक्षर पटेल, विपराज निगम आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात, दिल्लीने १८.१ षटकांत ४ बाद १६४ धावा करीत सामना जिंकला.
दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांत ६ गडी गमावून एकूण १६२ धावा उभारल्या. दिल्लीने १८.१ षटकांत १६३ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या गाठले; हे करताना त्यांनी ४ गडी गमावले. इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवीने ५१ चेंडूंत ७ षटकार आणि ७ चौकारांसह ९० धावा फटकावत 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार पटकावला. सलामीला आलेला श्रीलंकेचा अष्टपैलू पथुम निशांकाने ३० चेंडूंत १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या.
तत्पूर्वी, हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या सुर्यकुमार यादवच्या ५१ धावा (३६ चेंडूंत २ षटकार, ३ चौकार) आणि रोहित शर्माच्या ३५ धावांच्या (२६ चेंडूंत १ षटकार, ५ चौकार) जोरावर मुंबईने दीडशेपार मजला मारली.

