नवी दिल्ली : एकेकाळी आयपीएलची ओळख पॉवर हिटर स्पेशालिस्ट विदेशी फलंदाजांमुळे होती. ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, कायरन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नरसारखे खेळाडू लीगचा वेग ठरवत होते. पण यंदाच्या आयपीएलमध्ये ही स्थिती बदलली असून आता सामन्याची दिशा भारतीय फलंदाज ठरवत आहेत.
या हंगामात भारतीय फलंदाजांनी परदेशी फलंदाजांपेक्षा अधिक आक्रमक स्ट्राइक रेटने धावा केल्या. मात्र, गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता भारतीय खेळाडू संपूर्ण हंगामात दबावाखाली दिसले. परदेशी गोलंदाज कमी संख्येत असूनही अधिक प्रभावी ठरले.
भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीचा फायदा
आधी भारतीय फलंदाज अँकरच्या भूमिकेत दिसत होते आणि वेगवान फलंदाजीची जबाबदारी परदेशी खेळाडूंवर होती. आता भारतीय खेळाडू सुरुवातीपासूनच आक्रमक क्रिकेट खेळत आहेत आणि सामन्याचा वेग नियंत्रित करत आहेत.
यंदा भारतीय फलंदाजांचा सरासरी स्ट्राइक रेट १५७.०१ आहे. मागील हंगामात हा आकडा १५२ होता. यंदा परदेशी फलंदाजांनी १५५.३७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. मागील हंगामात परदेशी फलंदाजांनी सुमारे १५३ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या.
भारतीय गोलंदाज दबावाखाली
या हंगामात भारतीय गोलंदाजांनी २०२५च्या ५३३च्या तुलनेत यंदा ५०६ विकेट्स घेतल्या. त्यांची इकोनॉमी ९.४२ वरून ९.७९ पर्यंत वाढली. परदेशी गोलंदाजही मागील हंगामाच्या तुलनेत यावेळी अधिक महागडे ठरले, तरीही ते भारतीय गोलंदाजांच्या तुलनेत अधिक किफायतशीर राहिले आहेत.
'प्लेयर ऑफ द मॅच'मध्ये भारतीय कमी
या हंगामात ५३ खेळाडूंना 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला. यामध्ये ३१ भारतीय आणि २२ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांना भारतीयांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी तीन वेळा हा पुरस्कार मिळाला.
मागील हंगामातही ५३ खेळाडू 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडले गेले होते. यामध्ये ३५ भारतीय आणि १८ परदेशी खेळाडूंना हा पुरस्कार मिळाला होता. भारतीयांमध्ये श्रेयस अय्यर आणि कृणाल पंड्या सर्वाधिक प्रत्येकी तीन वेळा 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवडले गेले होते.
यंदा फलंदाजांचा स्ट्राइक रेट आणि सरासरीमध्येही वाढ, गोलंदाज मात्र मागे
क्रिकेटमध्ये असे म्हटले जाते की, फलंदाजीची सरासरी वाढवायची असेल तर स्ट्राइक रेटचा त्याग करावा लागेल आणि जर स्ट्राइक रेट वाढवायचा असेल तर सरासरीशी तडजोड करावी लागेल. क्रिकेटमध्ये जणू हा अलिखित नियम आहे. मात्र, यंदाच्या आयपीएलमध्ये हा नियम लागू होताना दिसत नाही. यंदा एकूण फलंदाजीची सरासरी आणि स्ट्राइक रेट दोन्हीमध्ये मागील हंगामाच्या तुलनेत वाढ नोंदवली गेली आहे. चौकार, षटकार, शतके आणि अर्धशतके यांची संख्यादेखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे.
गोलंदाजीचा विचार करता २०२५ मध्ये एकूण ८२९ विकेट्स पडल्या होत्या. २०२६ मध्ये ही संख्या घटून ८१३ झाली. गोलंदाजांची सरासरी ३१.४२ वरून वाढून ३२.४५ पर्यंत पोहोचली. म्हणजेच, एक विकेट घेण्यासाठी आधीपेक्षा जास्त धावा खर्च झाल्या. गोलंदाजांचा इकाॅनॉमी रेटदेखील आयपीएल इतिहासात सर्वांत महागडा राहिला. २०२५ मधील ९.५०च्या तुलनेत इकोनॉमी वाढून ९.७६ झाली.

