IPL 2026 (RCB vs GT Highlights) : गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) संघाने गुजरात टायटन्सचा ९२ धावांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. आरसीबीने कर्णधार रजत पाटीदारच्या स्फोटक खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात २५४ धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात गुजरातचा संघ १९.३ षटकांत १६२ धावांवर गारद झाला. गुजरातला फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी आहे. हा संघ आता बुधवारी हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात होणाऱ्या एलिमिनेटरमधील विजेत्या संघाशी शुक्रवारी 'क्वालिफायर-२' मध्ये भिडणार आहे.
आरसीबीने अशाप्रकारे एकूण पाचव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. याआधी हा संघ २००९, २०११, २०१६ आणि २०२५ मध्ये फायनलमध्ये पोहोचला होता. गेल्या हंगामात पंजाब किंग्सचा पराभव करून आरसीबीने विजेतेपद पटकावले होते आणि आता ते जेतेपद राखण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहेत.
गुजरातसाठी या सामन्यात काहीच चांगले घडले नाही. संघाचे गोलंदाज महागडे ठरलेच, शिवाय फलंदाजीही पूर्णपणे अपयशी ठरली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या राहुल तेवतियाने अर्धशतक झळकावले, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या तेवतियाने ६८ धावा केल्या. आरसीबीकडून जेकब डफीने तीन गडी बाद केले, तर भुवनेश्वर कुमार, रासिख सलाम डार आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. जोश हेझलवूडला एक यश मिळाले.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने पॉवरप्लेमध्येच पाच गडी गमावले. साई सुदर्शनच्या रूपाने गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला. विशेष म्हणजे, सुदर्शन अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला. जेकब डफीच्या चेंडूवर सुदर्शनने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॅट त्याच्या हातातून सुटली आणि थेट स्टंपवर जाऊन आदळली. अशा प्रकारे तो हिट विकेट होऊन माघारी परतला. सुदर्शनने ९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १४ धावा केल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने कर्णधार शुभमन गिलला बोल्ड केले. गिल ७ चेंडूत केवळ २ धावा करून बाद झाला.
जोश हेझलवूडने जोस बटलरला बाद करत गुजरात टायटन्सला तिसरा धक्का दिला. बटलर ११ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २९ धावा करून बाद झाला. त्यानंतर रासिख सलाम डारने गुजरातला दोन धक्के दिले. त्याने आधी निशांत सिंधूची विकेट घेतली आणि त्यानंतर जेसन होल्डरला शून्यावर बाद करून गुजरातचा डाव अडचणीत आणला. यानंतर गुजरातची फलंदाजी सावरू शकली नाही आणि संघाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. मात्र, आठ गडी बाद झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या राहुल तेवतियाने खिंड लढवली आणि अर्धशतक झळकावले. त्याने नवव्या विकेटसाठी मोहम्मद सिराजसोबत ६८ धावांची भागीदारी केली. तेवतियाने ४३ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या. आरसीबीकडून जेकब डफीने तीन बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार, रासिख सलाम डार आणि कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. जोश हेझलवूडला एक यश मिळाले.
तत्पूर्वी, टॉस हारल्यानंतर फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यावर आरसीबीने २० षटकांत ५ बाद २५४ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील प्लेऑफमधील ही सर्वात मोठी धावसंख्या (Total Score) आहे. आरसीबीने या बाबतीत गुजरातला मागे टाकले, ज्यांनी २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध ३ बाद २३३ धावा केल्या होत्या.
आरसीबीसाठी पाटीदारने ३३ चेंडूत ५ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने नाबाद ९३ धावांची खेळी केली, ज्यामुळे संघ विशाल लक्ष्य उभारण्यात यशस्वी झाला.कगिसो रबाडाने पाटीदारचा झेल २० धावांवर सोडला होता, जो गुजरातला शेवटी खूप महागात पडला. पाटीदारने या सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. त्याने कृणाल पंड्यासोबत चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. आरसीबीकडून कृणालने २८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या, तर कोहलीने २५ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली.
याव्यतिरिक्त देवदत्त पडिक्कलने ३०, व्यंकटेश अय्यरने १९ आणि टिम डेव्हिडने ४ धावांचे योगदान दिले. तसेच, जितेश शर्मा ५ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार ठोकून १५ धावांवर नाबाद राहिला. गुजरातसाठी रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर प्रसिद्ध कृष्णाला एक यश मिळाले.

