Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Karnataka politics : कर्नाटक राजकारणात भूकंप.! डी.के. शिवकुमार होणार नवे CM.? मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३.३० वाजता देणार राजीनामा.

Karnataka politics : कर्नाटक राजकारणात भूकंप.! डी.के. शिवकुमार होणार नवे CM.? मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुपारी ३.३० वाजता देणार राजीनामा.

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्र्यांसोबत 'ब्रेकफास्ट मीटिंग' घेतली. या बैठकीनंतर मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री आज दुपारी ३.३० वाजता आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.

सिद्धरामय्या यांनी यावेळी सर्व मंत्र्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले असून, या घडामोडीमुळे कर्नाटकात सत्तानाट्याला वेग आला आहे.

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांच्या दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार बेंगळुरू येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आयोजित 'नाश्ता बैठकीत' एकत्र दिसले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली. बैठकीदरम्यान डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वादही घेतले. राज्यातील नेतृत्वबदलाबाबत राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच या दोन्ही नेत्यांची ही भेट झाली आहे.

बैठकीदरम्यान सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना पद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये सिद्धरामय्या हे भावूक झालेल्या डीके शिवकुमार यांना मिठी मारताना दिसत आहेत.

कर्नाटक सरकारचे मंत्री एच. के. पाटील यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दुपारी ३ वाजता आपल्या पदाचा राजीनामा देतील. स्वतः सिद्धरामय्या यांनीच जाहीर केले आहे की, डीके शिवकुमार हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील.

कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या सस्पेन्सच्या दरम्यान, कर्नाटक काँग्रेसचे कार्यकर्ते उमा शंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, 'डीके शिवकुमार उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर याचा जल्लोष साजरा करू.'

म्हैसूरमध्ये 'कर्नाटक आर्मी'चे जिल्हाध्यक्ष तेजेश लोकेश गौडा म्हणाले की, सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमार, ज्यांनी गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षाची सेवा केली आहे, त्यांना आता मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी एक चांगले मुख्यमंत्री बनावे, यासाठी आम्ही भगवान गणपतीकडे प्रार्थना केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror