पुणे : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याची एक बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मात्र, ही बातमी पूर्णपणे खोटी आणि निराधार असून, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने केली फॅक्ट चेक…
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागाने याबाबत फॅक्ट चेक केली आहे. विभागाने स्पष्टीकरण दिल आहे की, "मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड' अशा मथळ्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेली बातमी खोटी आहे. त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली नाही. तशा आशयाच्या सर्व बातम्या निराधार आहेत."
महिला आयोगाचे अध्यक्षपद गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. अशातच बोरवणकर यांच्या नावाची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर फिरणाऱ्या या संदेशांमध्ये कोणत्याही अधिकृत शासन निर्णयाचा (GR) उल्लेख नसून, केवळ तर्क-वितर्कांच्या आधारे ही खोटी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे.
प्रशासकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अशा अनधिकृत आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, बोरवणकर यांनीही अशा कोणत्याही नियुक्तीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद सध्या रिक्त …
दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मावळत्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) या होत्या. त्यांची पहिल्यांदा ऑक्टोबर २०२१ मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांना पुन्हा तीन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. नाशिकमधील एका वादग्रस्त प्रकरणामुळे आणि राजकीय दबावामुळे त्यांनी २० मार्च २०२६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर हे पद सध्या रिक्त असून, नवीन अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

