Dailyhunt
Maharashtra | संभाजीनगरमध्ये गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, दहावी पास महिला १५ हजारांत करायची गर्भपात.

Maharashtra | संभाजीनगरमध्ये गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, दहावी पास महिला १५ हजारांत करायची गर्भपात.

माणुसकीला काळिमा; पाच वर्षांपासून सुरू गैरप्रकार, चौघे अटकेत…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

एका जागरूक महिलेने थेट पोलीस आयुक्तांना फोन करून माहिती दिल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी केंद्र चालवणाऱ्या मुख्य आरोपी महिलेसह चौघांना अटक केली असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या रॅकेटची कार्यपद्धती आणि त्यातील क्रूरता पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. मुख्य आरोपी शाहेदा परवीन ही केवळ १० वी उत्तीर्ण असून, १५ वर्षांपूर्वी एका प्रसूतीगृहात दाई म्हणून काम करताना तिने हे तंत्र आत्मसात केले होते. ती अवैध गर्भपातानंतर भ्रूण थेट खिडकीतून मागच्या नाल्यात फेकून द्यायची, जिथे कुत्रे गर्भाचे लचके तोडून त्याची विल्हेवाट लावत असत. या अघोरी कृत्यासाठी ती प्रत्येक रुग्णाकडून १५ हजार रुपये उकळायची. विशेष म्हणजे, याच काळ्या कमाईवर तिचा मुलगा लंडनमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

वैद्यकीय पदवी नसताना पॅथॉलॉजी लॅब

हे रॅकेट केवळ शहरापुरते मर्यादित नसून त्याचे जाळे ग्रामीण भागातही पसरले होते. या साखळीतील फरार आरोपी मंगेश थोरात आणि त्याची पत्नी मीनाक्षी हे दोघेही वैद्यकीय पदवी नसताना पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. ते ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या संपर्कात राहून रुग्ण मिळवायचे. या साखळीतील तोतया डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन थेट रुग्णांच्या घरी जायचे आणि लिंगनिदानासाठी ४५ ते ५० हजार रुपये घ्यायचे. जर गर्भ मुलगी असल्याचे आढळले, तर तिला गर्भपातासाठी शाहेदाकडे पाठवले जायचे.

दोन महिन्यातील तीसरे रॅकेट

गेल्या दोन महिन्यांत संभाजीनगरमध्ये उघडकीस आलेले हे तिसरे मोठे रॅकेट आहे. पोलिसांनी शाहेदा परवीन, तिचा पती सय्यद इर्शाद, नसरीन शेख आणि मीनाक्षी थोरात यांना अटक केली आहे. निवृत्त न्यायाधीशांच्या बंगल्यात हा गोरखधंदा सुरू असल्याने आजूबाजूच्या कोणालाही संशय आला नाही. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror