Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Odisha | बहिणीचा सांगाडा घेऊन भावाने गाठली बँक, कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील अटीमुळे हताश भावाचे टोकाचे पाऊल.

Odisha | बहिणीचा सांगाडा घेऊन भावाने गाठली बँक, कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशील अटीमुळे हताश भावाचे टोकाचे पाऊल.

डिशा : बँकेच्या तांत्रिक नियमांचा आणि कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेचा एक धक्कादायक प्रकार ओडिशामध्ये उघडकीस आला आहे. आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी धडपडणाऱ्या एका हताश भावाला चक्क बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँक गाठावी लागली.

ओडिशाच्या ग्रामीण बँकेत घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केओंझर जिल्ह्यातील डियानाली गावातील जीतू मुंडा यांची मोठी बहीण कलारा मुंडा यांचा २६ जानेवारी २०२६ रोजी मृत्यू झाला होता. कलारा यांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा होते. अत्यंत गरीब असलेल्या जीतू यांच्यासाठी ही रक्कम जगण्याचा मोठा आधार होती. बहिणीच्या मृत्यूनंतर हे पैसे मिळवण्यासाठी जीतू अनेकदा बँकेत गेले. त्यांनी बहिणीच्या मृत्यूची कल्पनाही बँक अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र, प्रत्येक वेळी बँक कर्मचाऱ्यांनी "खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या, तरच पैसे मिळतील" अशी जाचक आणि अशक्य अट घातली.

बँकेच्या वारंवार चकरा मारून आणि कर्मचाऱ्यांच्या वागण्याला कंटाळून अखेर जीतू यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी कबरीतून आपल्या बहिणीचा सांगाडा बाहेर काढला आणि तो खांद्यावर घेऊन ३ किलोमीटर चालत मल्लिपसी येथील ओडिशा ग्रामीण बँकेच्या शाखेत पोहोचले. बँकेच्या व्हरांड्यात सांगाडा ठेवताच तिथे उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांची एकच पळापळ झाली.

Heat wave | उष्णतेच्या लाटेचा देशाला विळखा, हवामान बदलामुळे तापमानात ऐतिहासिक वाढ…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीतू मुंडा हे निरक्षर असून त्यांना कायदेशीर वारस किंवा 'नॉमिनी' प्रक्रियेची कोणतीही माहिती नव्हती. कलारा मुंडा यांचा पती आणि मुलाचाही आधीच मृत्यू झाला असल्याने जीतू हेच एकमेव वारसदार होते. मात्र, बँक अधिकारी त्यांना ही प्रक्रिया साध्या भाषेत समजावून सांगण्यात अपयशी ठरले.

अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत जीतू यांना पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पोलिसांच्या उपस्थितीत तो सांगाडा पुन्हा सन्मानाने दफन करण्यात आला. एका गरीब आदिवासी व्यक्तीला हक्काच्या पैशांसाठी मृतदेहाची विटंबना करावी लागल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror