बेंगळुरू : दोन वेळचा पॅरालिम्पिक विजेता सुमित अंतिलने काल बेंगळुरू येथे आयोजित ८ व्या 'इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६' मध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 श्रेणीत ७४.८२ मीटरचा विक्रमी थ्रो फेकून स्वतःचाच जागतिक विक्रम मोडीत काढला.
हरियाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंतिलने सुवर्णपदक जिंकताना ७३.२९ मीटरचा आपला जुना जागतिक विक्रम ओलांडला, जो त्याने हांगझोऊ येथे २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रस्थापित केला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप सरगरने ६२.८८ मीटर थ्रोसह रौप्य पदक, तर राजस्थानच्या संदीपने ६१.८३ मीटरसह कांस्य पदक पटकावले. सुमितने या दोघांना मागे टाकत सहज अव्वल स्थान मिळवले.
या चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशी ट्रॅक आणि फिल्ड इव्हेंट्समध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाल्या. पॅरालिम्पिक पदक विजेता प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी (High Jump T64) स्पर्धेत २.०० मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले, तर भारताच्याच वरुण सिंह भाटीने १.८४ मीटरसह रौप्य पदक मिळवले.
महिलांच्या ४०० मीटर T20 शर्यतीत टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती दीप्ती जीवनजीने ५७.८४ सेकंद वेळेसह विजय मिळवला. तसेच, महाराष्ट्राच्या दिलीप गावीतने पुरुषांच्या ४०० मीटर T47 श्रेणीत ४७.६४ सेकंदात धावून सुवर्णपदकावर नाव कोरले.

