Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Patri Sarkar 1942 : स्वातंत्र्याची धगधगती गाथा.

Patri Sarkar 1942 : स्वातंत्र्याची धगधगती गाथा.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १९४२ चे आंदोलन हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत टप्पा मानला जातो. याच कालखंडात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतीची एक अभूतपूर्व मशाल पेटली होती.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या गेलेल्या 'प्रतिसरकार' अर्थात 'पत्री सरकार'ने ब्रिटिश हुकूमशाहीला हादरवून सोडले होते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या याच ऐतिहासिक आणि धगधगत्या अध्यायावर आधारित 'पत्री सरकार १९४२' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून, नुकतेच या चित्रपटाचे पहिले अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

पोस्टरच्या प्रदर्शनानंतर चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये या ऐतिहासिक कलाकृतीबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये स्वातंत्र्यलढ्यातील तणावपूर्ण आणि रोमहर्षक वातावरण अत्यंत प्रभावीपणे रेखाटण्यात आले आहे. हातात बंदूक घेतलेला खंबीर क्रांतिकारक, घोड्यावर स्वार होऊन ब्रिटिशांशी दोन हात करणारा योद्धा, रणभूमीवरील आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट यांमुळे या चित्रपटाची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. इंग्रजांची दडपशाही आणि सावकारशाहीविरुद्ध पेटून उठलेल्या क्रांतिकारकांचा संघर्ष पोस्टरमधून जिवंत होतो.

१९४२ च्या आंदोलनात क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड आणि नागनाथ अण्णा नायकवडी यांसारख्या थोर नायकांनी सातारच्या भूमीत समांतर शासन व्यवस्था निर्माण केली होती. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या या प्रतिसरकारच्या गनिमी काव्याची आणि पराक्रमाची दखल थेट लंडनच्या संसदेपर्यंत घेतली गेली होती. इतिहासजमा झालेल्या याच गौरवशाली संघर्षाची आणि अनेक अज्ञात, दुर्लक्षित स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.

चित्रपटाच्या निर्मितीची धुरा 'भागीरथी मोशन पिक्चर'च्या बॅनरखाली विशाल गोविंदराव जाधव यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गीत, संगीत, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन ही सर्व महत्त्वाची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी एकहाती पेलली आहे. संकलन कर्तव्य मोकल यांचे असून संदीप वाटवे, सुमेध मराठे व परमहंस पाठक यांनी उत्कृष्ट छायांकन केले आहे. सौरभ लता शिवकुमार यांच्या पार्श्वसंगीताने दृश्यांना अधिक उठाव दिला आहे. विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांच्या दमदार आवाजात चित्रपटातील गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.

Ramayan : बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'रामायण पार्ट १' या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित…

क्रांतीचा खरा आवेश आणि त्यामागील प्रामाणिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते, असे दिग्दर्शक मनीष अनसुरकर यांनी स्पष्ट केले. संपूर्ण टीमच्या कठोर परिश्रमामुळे हे आव्हान यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी सांगितले. पोस्टरनंतर आता लवकरच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचा हा इतिहास नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror