Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCMC : एकीकडे टंचाई, दुसरीकडे नासाडी..! नवी सांगवीतील फेमस चौकात खोदाईदरम्यान फुटली जलवाहिनी..

PCMC : एकीकडे टंचाई, दुसरीकडे नासाडी..! नवी सांगवीतील फेमस चौकात खोदाईदरम्यान फुटली जलवाहिनी..

हरात दिवसाआड पाणीपुरवठा असताना हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय…

पिंपरी (दि.३) : नवी सांगवीतील फेमस चौकात विकास कामांच्या नावाखाली सुरू असलेल्या खोदाईदरम्यान जलवाहिनी फुटली. यामुळे हजारो लिटर पिण्याचे शुद्ध पाणी रस्त्यावरून वाहून गेले.

एकीकडे संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून, १५ टक्के पाणी कपात लागू आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याचा उघड अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे मावळमधील पवना धरण १०० टक्के भरले आहे. धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. असे असतानाही नवी सांगवीतील समतानगर, गणेशनगर, संत तुकारामनगर, समर्थनगर यांसह अनेक उपनगरांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा भासत आहे. या भागांत जेमतेम दोन तास आणि तेही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो. धरणात पाणी असूनही केवळ प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे सांगवीकरांवर कृत्रिम पाणीटंचाई लादली गेली आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत.

तसेच महापालिकेने किंवा ठेकेदारांनी कामाच्या ठिकाणी कोणतीही बॅरेकटेड किंवा फलक लावलेला दिसत नाही. नव्या सांगतील फेमस चौकात चारी बाजूंनी अर्धा किलोमीटर पर्यंत पाणीपुरवठ्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली होत आहे. त्या ठिकाणी वाहतूक शाखेचा किंवा ठेकेदाराचा कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. याला जबाबदार कोण आणि ठेकेदारावर कोणाचा वचक आहे असाही प्रश्न निर्माण होत आहे.

यावेळी सांगवीतील स्थानिक सांगत होते की, "आम्हाला दोन तास पाणी मिळते, त्यात अर्धा तास गढूळ पाणी येते. घरात पिण्यापुरते पाणी साठवायला कसरत करावी लागते. दुसरीकडे रस्त्यावर पाण्याचे पाट वाहतात. हा पालिकेचा कोणता न्याय?" अशा शब्दांत समतानगर व गणेशनगरमधील महिलांनी आपला संताप व्यक्त केला. दिवसाआड पाणी देऊन पालिकेने आधीच नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. शहरात पाणी कपातीचे नियम फक्त सर्वसामान्य करदात्या नागरिकांसाठीच आहेत का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

काळजी न घेता सर्रास चालवतात जेसीबी

फेमस चौकातील घटना ही पहिली वेळ नाही. शहरात कुठेही खोदाई करताना संबंधित विभागाकडून भूमिगत वाहिन्यांचा नकाशा घेतला जात नाही. ठेकेदारांचे कामगार कोणतीही पूर्वकल्पना किंवा काळजी न घेता सर्रास जेसीबी चालवतात. पाईपलाईन फुटल्यानंतर पाणी बंद करायला पालिकेचे कर्मचारी तासनतास पोहोचत नाहीत, तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाहून जाते. या पाण्याच्या नासाडीला जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांवर पालिका प्रशासन कारवाई करायला हवी.

Pimpri-Chinchwad : महापालिकेच्या अग्निशमन विभागातील ४५० फाईल गहाळ?

ठेकेदारावर कारवाईची स्थानिकांची मागणी

पाईपलाईनचे काम चालू असताना फेमस चौकात पाईप फुटून हजारो लिटर पाणी वायाला जात आहे. काम चालू असताना कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्या ठिकाणी देखरेख करण्याचे काम हे पालिका पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे काम आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या भागात पावसाळ्यात नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. यासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी पाणीपुरवठा विभागाचे अजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror