विनापरवाना लोंबकळणाऱ्या केबल्स उठल्या नागरिकांच्या जीवावर; महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप
पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला आता अनधिकृत केबल आणि फायबर ऑप्टिक वायर्सच्या जंजाळाने विळखा घातला आहे.
प्रशासनाच्या डोळेझाक आणि खासगी कंपन्यांच्या मनमानीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण वाढले असून, निगडी प्राधिकरणात एका महिलेचा केबलमुळे गळा अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आता "आम्ही स्मार्ट सिटीत राहतो की केबल सिटीत?" असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या कोषाध्यक्षा संपदा संदीप पटवर्धन (वय ४८) यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबलमध्ये त्यांचा गळा अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. खासगी रुग्णालयात तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. महापालिकेचा ढिसाळ कारभार आणि केबल कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शहरातील उड्डाणपूल, पथदिव्यांचे खांब आणि झाडांवरून बड्या इंटरनेट व टीव्ही केबल कंपन्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता आपले जाळे पसरवले आहे. अनेक ठिकाणी या वायर्स रस्त्यात लोंबकळत आहेत, तर कुठे तुटून पडल्या आहेत. थेरगाव येथील डांगे चौकातील उड्डाणपुलावरही अशाच वायर्स कोसळल्याने दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारे हे 'केबलचे जंजाळ' नागरिकांच्या जिवावर उठले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अशा अनधिकृत सेवा वाहिन्यांमुळे होणारे अपघात रोखण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या मृत्यूला जबाबदार असणारे संबंधित अधिकारी आणि दोषी केबल कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आता तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का आणि शहरातील हे मृत्यूचे सापळे हटवले जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लटकणाऱ्या केबल्समुळे शहराचे विद्रूपीकरण
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, रावेत, चिंचवड, आकुर्डी आणि पिंपरी या उपनगरांमध्ये 'ब्रॉडबॅण्ड' सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी विद्युत खांबांवरून अनधिकृत केबल टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. मोठ्या गृहनिर्माण संस्था, वाणिज्य वसाहती, शाळा व रुग्णालयांच्या इमारतींवरून थेट या केबल ओढल्या आहेत. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी बीआरटी बस थांब्यांचा आधार घेऊन या वायर्स रस्त्यांवरून सोसायट्यांमध्ये नेल्या आहेत. परिणामी, भूमिगत पुरवठा असायला हवा तो प्रत्यक्षात खांबावरून लटकणाऱ्या केबलमधून होत आहे. या अनधिकृत केबल्समुळे परिसर विद्रूप झाला असून, शहराला बकालपणा आला आहे. याशिवाय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतानाही प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.
केबल टाकण्यासाठी उड्डाणपुलांचा वापर
नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावर सेवा वाहिन्यांच्या केबल मोठ्या प्रमाणात लटकलेल्या दिसतात. कासारवाडी, सांगवी व दापोडी परिसरातही अनधिकृत केबल टाकण्यात आल्या असून, त्या रस्त्यावर पडून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तरीदेखील प्रशासनाने यावर अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाचाही केबल टाकण्यासाठी आधार घेतला गेला आहे. तसेच, सर्वत्र विद्युत खांबांवरूनही केबल ओढल्या गेल्या आहेत. परिणामी, परिसराचे सौंदर्य हरवून बकालपणा आला आहे. इंद्रायणीनगर, मोशी, चिखली, मोरे वस्ती, त्रिवेणीनगर आणि तळवडे भागांत तर विद्युत खांबांवरून अनधिकृत केबल टाकण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यांचे आणि चौकांचे सौंदर्य धोक्यात आले असून, केबलच्या जाळ्यांमुळे अपघाताचा कायम धोका निर्माण झाला आहे.
लोंबकळणाऱ्या केबलने घेतला निष्पापाचा जीव
तीन दिवसांपूर्वी संपदा पटवर्धन या आपल्या स्कूटरवरून जात असताना रस्त्यावर लोंबकळणाऱ्या इंटरनेट/केबल वायरमध्ये त्यांचा गळा अचानक अडकला. यामुळे त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्या जोरात खाली कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूत रक्तस्राव झाला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
अपघात की प्रशासनाच्या अनस्थेचा बळी?
शहरात इंटरनेट, वाय-फाय आणि डिश टीव्हीच्या केबल्सचे जाळे अत्यंत धोकादायक पद्धतीने पसरले आहे. अनेक ठिकाणी या वायर्स रस्त्यावर सैलपणे लटकत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, ही घटना उपमहापौरांच्या प्रभागातच घडल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. "हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू आहे," असा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.
शहरात बड्या उद्योजकाच्या इंटरनेट आणि टीव्ही केबल्सने शहराचे सौंदर्याला बाधा निर्माण होत आहे. या केबल्स चालक, मालकांनी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. शहरातील अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या केबल्समुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, या केबल काढण्यासाठी कोणीही आले नाही. याबाबत तक्रार कोणाकडे करायची? केबल कंपन्यांना कडक कारवाई करुन केबल्स जाळे तत्काळ हटवावे.
- रविराज काळे, प्रदेशाध्यक्ष, आप युवा आघाडी
शहराच्या अनेक भागात रस्त्याच्या मधोमध विद्युत खांबावरुन केबल टाकलेल्या आहेत. त्यावरून केबल टाकताना महापालिकेची परवानगी नसताना काही केबल कंपन्यांनी वायर टाकले आहेत. अनेकवेळा या वायरचे जाळे खाली लोंबकळलेल्या, रस्त्यावर विखुरलेल्या असतात. यामुळे अनेकदा अपघात होवून देखील महापालिका अतिक्रमण विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे महापालिका अधिकारी आणि कंपन्यावर गुन्हे दाखल व्हावेत.
- राहूल कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ता
केबल कंपन्यांना महापालिकेच्या मालमत्तेवरून वायर टाकण्याची परवानगी दिली जात नाही. अनधिकृतपणे केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे.
- राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
शहरातील विद्युत पथदिव्याच्या खांबावरुन सेवा वाहिन्यांची केबल टाकण्याची परवानगी दिली जात नाही. महापालिकेकडून कोणत्याही कंपन्यांनी परवानगी दिलेली नाही. शहरातील टाकलेल्या सर्व केबल ह्या अनधिकृत आहेत. याविषयी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला वारंवार पत्र देवून केबल हटवण्यास सांगितलेले आहेत. पण, अतिक्रमण विभागाकडून केबल काढण्यात आलेल्या नाहीत. याबाबत महापालिकेकडून प्रसिध्दीकरण देवून धोरण बनविण्यात येत आहे.
- अनिल भालसाकरे, सहशहर अभियंता, विद्युत विभाग,
निगडी परिसरात सेक्टर २६ राहणाऱ्या संपदा पटवर्धन या महिला दुचाकीवरून जात असताना, कमी उंचीवर लटकणाऱ्या केबलमध्ये गळा अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा महापालिकेच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकाचा बळी आहे. यावर वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन आणि विद्युत विभागाने धोकादायक केबल्स हटवण्याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिका आयुक्ताना पत्र देवून संबंधित कंपनीवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
- शैलजा बाबर, उपमहापौर, महापालिका.
अनधिकृत केबल्सने शहराचे विद्रुपीकरणा होवू लागले आहे. पथदिव्यांचे खांब आणि झाडांवर अनेक सेवा पुरवठादार कंपन्यांनी कोणतीही परवानगी न घेता केबल टाकल्या आहेत. अनेक ठिकाणी केबल तीन-चार फूट उंचीवर लटकत आहेत, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा अपघाताचा धोका वाढला आहे. अनधिकृत केबल्स त्वरित हटवाव्यात आणि संबंधित कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
- अमित गोरखे, आमदार, विधान परिषद

