Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCMC : पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांचीच मुस्कटदाबी, पक्ष बैठकीत ठरलेली भूमिकाच सभागृहात मांडण्याचे आदेश.

PCMC : पालिकेत सत्ताधारी नगरसेवकांचीच मुस्कटदाबी, पक्ष बैठकीत ठरलेली भूमिकाच सभागृहात मांडण्याचे आदेश.

विरोध केल्यास शिस्तभंग कारवाईचा सत्तारूढ पक्षनेत्यांचा इशारा

पिंपरी : सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी पक्षाच्या बैठकीत ठरलेल्या भूमिकेनुसारच महापालिका सभागृहात बोलावे. कोणत्याही विषयाला विनाकारण विरोध करू नये, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मंगळवारी (दि.

३०) पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना सभागृहात स्वतंत्र भूमिका मांडण्यावर मर्यादा येणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिकेत जानेवारी २०२६ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षातील अंतर्गत विसंवाद वारंवार समोर येत आहे. पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यात समन्वय नसल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची बाब प्रदेश नेतृत्वाच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर प्रदेश पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून स्थानिक नेतृत्वाला फटकारले असून, पक्षशिस्त अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

PCMC : सोसायट्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे महापालिका नमली; गृहनिर्माण प्रकल्पांतील ओला कचरा पूर्वीप्रमाणेच उचलला जाणार…

Make Civic Mirror My Trusted Source

यापुढे महत्त्वाच्या विषयांवर कोअर कमिटीची मंजुरी घेतल्यानंतरच पदाधिकारी, नगरसेवक किंवा पक्षाचे प्रतिनिधी अधिकृत भूमिका मांडतील, असे धोरण निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रशांत शितोळे यांनी दिली. सभागृहातही पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या महिन्यात पुनावळे येथील आरक्षित जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रस्तावाला भाजपच्याच काही नगरसेवकांनी विरोध केला होता. तसेच ६० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारावरही काही नगरसेवकांनी उघडपणे भाष्य केल्याने पक्षाची कोंडी झाली होती. अनेक नवखे नगरसेवक सभागृहाच्या नियमांबाबत अनभिज्ञ असल्यानेही सत्ताधारी पक्षाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जाते.

एखाद्या निर्णयाला नकारात्मक सूर लागला तर संघटनात्मक संरचना धोक्यात येते. आता यापुढे खऱ्या अर्थाने भाजपचा कारभार सुरू होणार आहे. आतापर्यंत प्रशासकीय राजवटीतील निर्णयावर कामकाज चालू होते. त्यामुळे यापुढे सभागृहात नगरसेवकांनी विरोध केला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. हा शिस्तीचा पक्ष आहे. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी नियमांचे पालन करावे.

- प्रशांत शितोळे, सत्तारुढ पक्षनेते, भाजप

नगरसेवकांच्या अनियंत्रित वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची भावना नेतृत्वामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पक्षशिस्तीच्या नावाखाली नगरसेवकांच्या वक्तव्यांवर निर्बंध घालण्यात आले असून, सभागृहात स्वतंत्र मत मांडण्याचे स्वातंत्र्य मर्यादित होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीला महापौरच गैरहजर

नुकतीच भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील माजी खासदार अमर साबळे, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, माजी आमदार अश्‍विनी जगताप, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे उपस्थित होते. मात्र, शहराचे प्रथम नागरिक म्हणून ओळख असलेले व महत्वाचे पद असलेले महापौर रवी लांडगे हेच बैठकीला गैरहजर होते. ते रायगड याठिकाणी गेले असल्याने उपस्थित राहिले नसल्याचे पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी स्पष्ट केले.

बोगस उपसूचना घोटाळ्यावर सत्तारूढ पक्षनेत्यांचे बेजबाबदार विधान

महापालिकेतील लेखा विभागात बोगस उपसूचना देत ६० कोटींचा घोटाळा झाला. वेगवेगळ्या १४ बोगस उपसूचनांद्वारे कोट्यवधींची बिले ठेकेदारांना मार्चअखेर अदा करण्यात आली. यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी, कर्मचारी व नगरसेवकांवर कारवाई अपेक्षित असताना फक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांची बदली करण्यात आली. त्यात भर सत्तारुढ पक्षनेते शितोळे यांनी आमच्यासाठी तो विषय संपला, असे जाहीर करत बेजबाबदार वक्तव्य केले. ते म्हणाले, आमच्यासाठी ६० कोटींचा घोटाळा हा विषय संपला आहे. त्यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्याची बदली झाली आहे. आयुक्तांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार नव्हते. यामध्ये शहराची बदनामी झाली आहे. त्यामुळे तो विषय आता संपला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror