Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCMC | पाण्याची नासाडी शिवाय ३५ टक्के गळती; महापालिकेकडून कारवाईस चालढकल, पाणी वाया घालवणार्‍यांना अभय.

PCMC | पाण्याची नासाडी शिवाय ३५ टक्के गळती; महापालिकेकडून कारवाईस चालढकल, पाणी वाया घालवणार्‍यांना अभय.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील सहा वर्षात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे दोन दिवसांचे पाणी एका दिवसात सोडले जात आहे. पाणी आल्यानंतर अंगण, पार्किंग, जीने तसेच, वाहने धुणे असे प्रकार सर्रासपणे केले जात आहेत.

इमारती, बंगले व घरावरील पाण्याच्या टाक्या भरून वाहतात. अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणार्‍यांवर महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. याबाबत कोणताही नियम नसल्याचे सांगत पाणीपुरवठा विभागाकडून कारवाईसाठी हात झटकले जात आहेत. परिणामी, ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडीचे प्रमाण वाढल्याने काही भागांस पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज ६७० एमएलडी पाणी शहराच्या अर्धा भागात दिले जाते. ते पाणी दोन दिवस पुरेल इतके असते. काही भागांत दोन तास तर, काही भागात ४ ते ५ तास पाणी सोडले जाते. त्या पाण्याची नागरिक घरातील टाक्यात साठवून करुन ठेवतात.

पाणी आल्यानंतर अंगण, पार्किग, जिने तसेच, रस्ते धुण्याचे प्रकार सर्रासपणे केले जातात. तसेच, अनेक जण आपली वाहनेही धुतात. ते पिण्याचे पाणी कुंड्या, झाडे व बागेस दिले जाते. तसेच, इमारत, बंगले व घराच्या गच्चीवरील तसेच, जमिनीतील टाक्या पाण्याने भरून वाहतात. अनेकांचे नळ व नळजोड नादुरूस्त असल्याने मोठ्या प्रमाणात गळती होते. अनेक दुकानदार, व्यापारी व विक्रेते पिण्याचे पाण्याचा वापर करतात. या सर्व कारणांने दररोजन मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होते.

पाण्याची नासाडी करणार्‍यावर महापालिकडून कारवाई केली जात नाही. त्याबाबत विचारले असता, तसा महापालिकेचा नियम नाही. विचारणा केल्यास आम्ही बिल भरतो, असा दम नागरिकांकडून दिला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.

पाण्याची ३५ टक्के गळती होत असल्याचा दावा…

महापालिकेकडून केल्या जाणार्‍या पाण्यापैकी तब्बल ३५ टक्के पाण्याची गळती होते, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. ती गळती म्हणजे बेहिशेबी पाणी होय. अनधिकृत नळजोड, व्हॉल्वमधून गळती, खासगी टँकरकडून बेकायदा वापर, पाणी चोरी आदी प्रकारामुळे ही गळती होत असल्याचे त्या विभागाकडून सांगितले जात आहे. परिणामी, पिण्याचे पाणी १०० टक्के अधिकृत नळजोड असलेल्या ग्राहकांना मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिकेकडून केला जाणार पाणीपुरवठा

पवना धरण-५५० एलएलडी
आंद्रा धरण-९० एमएलडी
एमआयडीसी-३० एमएलडी
एकूण-६७० एमएलडी

या प्रकारे होते पाण्याची नासाडी

सार्वजनिक नळाना तोट्या नसणे
इमारत, सोसायटी, बंगल्यावरील पाण्याची टाकी भरून वाहने
घरातील नळ तोट्या, नळवाहिन्या नादुरुस्त
शिळे पाणी म्हणून ओतून देणे
रस्ते, अंगण, पार्किग, जीने धुवून घेणे
दुचाकी, रिक्षा, कार धुणे
झाडे, कुंड्या, बागेत पाणी देणे
नादुरूस्त व्हॉल्वमधून पाणी गळती
दुकानदार, विक्रेत्यांकडून पाण्याचा वापर

निगडीत २४ तास पाणी; इतरांना दोन दिवसातूनही पुरेसे पाणी नाही-

संपूर्ण शहराला गेल्या साडेसहा वर्षांपासून दोन दिवसांपासून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा असे नाव दिले आहे. संपूर्ण शहराला दोन दिवसांतून एकदा पाणी देत असताना प्राधिकरण, निगडी या उच्चभ्रू परिसराला दररोज २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्या भागास सर्व शहराप्रमाणे पाण्याचा एकच दर आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई असतानाही त्या भागास २४ तास पाणी दिले जात आहे. त्यामुळे तो भाग महापालिकेसाठी खास आणि विशेष आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाच्या या दुप्पटी भूमिकेबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्या भागासही संपूर्ण शहराप्रमाणे दोन दिवसांतून एकदाच पाणी दिले जावे, अशी मागणी शहवासीयांकडून केली जात आहे.

उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. पाणी वाढत नसून, उपलब्ध असलेल्या मर्यादित स्त्रोतातून पाणी संपूर्ण शहराला पुरवावे लागते. अशा परिस्थितीतही पाण्याची नासाडी करणार्‍यावर कारवाई करता येत नाही. त्यासाठी महापालिकेकडून जनजागृती मोहिम हाती घेतली जाणार आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. नळजोडास थेट विद्युत मोटार लावून पाणी खेचणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. - विक्रांत बगाडे (अतिरिक्त आयुक्त ,पिंपरी चिंचवड मनपा)

बिल भरतो, मग का विचारता?

आम्ही पाण्याचे बिल भरतो. मग, पाणी कितीही वापरू, तुम्ही का विचारता, असा उर्मट प्रतिप्रश्न पाण्याची नासाडी करणार्‍यांकडून केला जाता. तसेच, अशा लोकांवर कारवाई करण्याची कोणताही नियम नसल्याने महापालिका प्रशासनाला कारवाई करता येत नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

नळजोडास थेट विद्युत मोटार लावून पाणी खेचणार्‍या नागरिकांवर कारवाई केली जाते. ते मोटार जप्त केले जातात. क्षेत्रीय कार्यालयानिहाय पाणीपुरवठा पथकाकडून ही कारवाई केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात ही कारवाई केली जाते. वर्षभरात एकूण १०० मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून अनधिकृत नळजोड अधिकृत केले जात आहेत. त्या माध्यमातून पाण्याची चोरी थांबण्याचा प्रकारास आळा घातला जात आहे. शहरात ५० हजार अनधिकृत नळजोड असल्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंत महापालिकेने ४ हजार ५०० नळजोड अधिकृत केले आहेत. त्यांच्याकडून दंडासह रक्कमेची वसुली केली आहे. या कामासाठी नेमलेले एजन्सीवर पाणीपुरवठा विभागाने ३२ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याची कार्यवारी सुरू आहे. तसेच, महापालिकेचे पाणी वापरणार्‍या वॉशिंग सेंटरवही कारवाई केली जात आहे. - प्रमोद ओंभासे (मुख्य अभियंता ,पिंपरी चिंचवड मनपा)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror