Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
PCMC : ..तर महापालिकेला ठोकणार टाळे; आमदार रोहित पवार यांचा इशारा.

PCMC : ..तर महापालिकेला ठोकणार टाळे; आमदार रोहित पवार यांचा इशारा.

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील दुर्घटनेस अधिकारी आणि कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा केला आरोप

पिंपरी : मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या गंभीर दुर्घटनेला 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी नेमलेली अँटोनी लारा कंपनी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारीच पूर्णपणे जबाबदार आहेत.

संबंधितांवर केवळ निलंबनाची कारवाई करून चालणार नाही, तर दोषी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या संचालकांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आक्रमक मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. येत्या दहा दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास शहरात मोठे जनआंदोलन उभारून महापालिकेला टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिला.

गुरूवारी (दि. ३०) आमदार पवार यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या दुर्घटनेतील जखमी कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांची भेट घेतल्यानंतर त्यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली.

माध्यमांशी बोलताना आमदार पवार म्हणाले की, महापालिकेने उभारलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात अनेक नियम पायदळी तुडवले गेले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ७०० टन असताना तिथे १२०० टन कचरा टाकला जात होता. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या नावाखाली ठेकेदाराने खिशे भरले आणि अधिकाऱ्यांनी त्याला साथ दिली.

नवीन बायोमायनिंगचा प्रकल्प आराखडा करण्यासाठी दिला आहे. तो ज्या इमारतीबाबत दुर्घटना घडली, त्याच प्रकल्पाचा आराखडा करणाऱ्याला दिला आहे. हा नवीन प्रकल्प ३७५ कोटी रुपयांचा आहे. सत्ताधाऱ्यांनी या नवीन प्रकल्पामध्ये काही दुर्घटना होणार नाही, असे लेखी द्यावे. या प्रकरणाबाबत सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही. मात्र. याबाबत काही कारवाई झाली नाही, तर आम्ही पालिकेला टाळे लावणार.

- रोहित पवार, आमदार

मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तसेच कार्यकारी अभियंता आल्हाट यांनी बोगस पदवीच्या आधारे पद मिळवल्याचा आरोप करत त्याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी आमदार पवार यांनी केली. आयुक्त याप्रकरणी योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

PCMC : कचरा व्यवस्थापनासाठी नवा फॉर्म्युला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय…

आमदार लांडगे यांचा वरदहस्त?

संबंधित अधिकारी आणि कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही. त्यांच्यावर आमदार महेश लांडगे यांचा वरदहस्त आहे. याबाबत नातेवाइकांनी देखील आरोप केले आहेत. त्यांची मोठी दहशत असून, त्यांच्या दबावाखाली दोषी अधिकारी आणि कंपनीच्या संचालकांना वाचवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करत असल्याचा घणाघाती आरोप आमदार पवार यांनी केला. संजय कुलकर्णी हे आमदार लांडगे यांच्या जवळचे आहेत. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Civic Mirror