पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री एका सहा वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली होती.
विनायक तुकाराम भवारी (वय ३५, रा. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय ६) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय ७९) या दोघीच होत्या. मध्यरात्री आरोपीने घरात प्रवेश करून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली.
शुक्रवारी सकाळी संगीता गवारी कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. बी. नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक भवारी हा मिस्त्री काम करतो. त्याचे तक्रारदार महिलेशी दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. कौटुंबिक कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होते आणि ते एक महिन्यापासून विभक्त राहत होते.
विनायक भवारी वारंवार घरी ये-जा करत असल्याने मयत मंगल शिंदे त्याला जाब विचारत होत्या. तसेच, मुलगी धनश्री देखील त्याला घरी येऊ नको असे सांगत होती. ते एक महिन्यापासून विभक्त राहत होते.
विनायक भवारी वारंवार घरी ये-जा करत असल्याने मयत मंगल शिंदे त्याला जाब विचारत होत्या. तसेच, मुलगी धनश्री देखील त्याला घरी येऊ नको असे सांगत होती. या रागातून आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन मंगल शिंदे यांची हत्या केली. मंगल शिंदे यांची हत्या करत असताना अल्पवयीन धनश्रीने आरडाओरड केली. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने तिचाही गळा आवळून खून केला.
फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कॉड यांच्या मदतीने तपास
घटनेची माहिती मिळताच पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि डॉग स्कॉड यांच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने बोथट हत्याराने दोघींवर हल्ला करण्यात आलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतदेहांवरील जखमांवरून हल्ला अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून, संशयितांची चौकशी सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळं परिसरात दहशतीचं वातावरण असून नागरिकांनी आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

