पिंपरी : औद्योगिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत रस्ते आता मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी 'आरएमसी' (रेडी मिक्स काँक्रीट) वाहनांवर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी सायंकाळी ४ ते ९ या वेळेत शहरात येण्यास बंदी घातली आहे.
तसेच इतर दिवशी सकाळी ११ से ५ या ठराविक वेळेतच त्यांना प्रवास करण्याची शिथिलता देण्यात आली आहे. पोलिसांचा हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी दुसरीकडे पाण्याचे टँकर आणि अवजड 'हायवा' वाहनांना कोणतीही प्रवेश बंदी नसल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दोन प्रकारच्या वाहनचालकांमुळे शहरातील सर्वसामान्य वाहनधारकांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, निगडी, मोशी, चिखली, चऱ्होली, भोसरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी, पिंपळे निलख, यासह अनेक भागातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत मार्गांवरून धावणारे पाण्याचे टँकर आणि हायवा चालक वाहतुकीचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत. अत्यंत बेजबाबदारपणे आणि सुसाट वेगाने ही वाहने चालवली जात आहेत.
अनेक भागांत हे चालक केवळ स्वतःचाच रस्ता असल्यासारखे वागत असून, इतर लहान वाहने, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, ज्या वाहतूक पोलिसांवर या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, ते पोलीस या सर्व प्रकाराकडे पूर्णपणे डोळेझाक करत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे या वाहनचालकांचे धाडस आणखी वाढले आहे.
महापालिकेने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून 'बीआरटी' मार्ग तयार करण्यात आले आहेत. या मार्गातून केवळ पीएमपीएल बसेस धावणे अपेक्षित आहे. मात्र, अवजड हायवा आणि पाण्याचे टँकर सर्रासपणे या बीआरटी लेनमध्ये घुसून प्रवास करतात. एवढेच नव्हे तर, वेळेची बचत करण्याच्या नावाखाली हे चालक अनेकदा मुख्य रस्त्यांवरून उलट दिशेने आपली अवजड वाहने चालवतात. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना यामुळे जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
Pimpri-Chinchwad : पवना भरले, तरीही शहरात पाणीकपात कायम…..
शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सिग्नल लाल असतानाही, हे टँकर आणि हायवा चालक न थांबता सुसाट वेगाने वाहने पुढे दामटतात. यामुळे गेल्या काही महिन्यांत गंभीर आणि प्राणघातक अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, आरएमसी वाहनांप्रमाणेच पाण्याचे टँकर आणि अवजड हायवा वाहनांच्या शहरात प्रवेश करण्याच्या वेळा तातडीने निश्चित केल्या पाहिजेत, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. केवळ विशिष्ट वाहनांवर निर्बंध घालून शहरातील वाहतूक सुधारणार नाही, तर सर्वच अवजड वाहनांना शिस्त लावणे गरजेचे आहे.
विशेषता सकाळच्या आणि संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी या वाहनांना शहरात प्रवेश बंदी असायला हवी. तसेच, बीआरटी मार्ग, उलट दिशेने वाहन चालवणे आणि सिग्नल तोडणाऱ्या टँकर व हायवा चालकांवर वाहतूक पोलिसांनी तात्काळ कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. जर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करणे सुरूच ठेवले, तर पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांवर नागरिकांचे बळी जात राहतील, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
शहरात आरएमसी वाहनासाठी अंतिम एसओपी तयार करण्यात येत आहे. वाहनावर कॅमेरा बसविणे, वाहनावर क्लिनर ठेवणे बंधनकारक आहे. हायवा, डंपर, ट्रक व इतर जड वाहनांना वाहतुकीत कोणतेही बदल अथवा शिथिलता देण्यात आलेली नाही. याबाबत २९ जूलै २०२६ नूसार अंमलबजावणी ही अंतिम एसओपी तयार होईपर्यंत अधिसुचना लागू राहणार आहे.
- विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
काय आहे पोलिसांचे आदेश?
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातर्गंत शनिवार आणि रविवारी या आठवड्यातील दोन दिवसामध्ये सायंकाळी ४ ते ९ या कालावधी पुर्णपणे बंदी ठेवून उर्वरित वेळात आरएमसी वाहतुकीला प्रवेश बंदीतून शिथिलता देण्यात आली आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी या आठवड्यातील पाच दिवस सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत आरएमसी वाहन वाहतुकीस प्रवेश बंदीतून शिथिलता देण्यात आलेली आहे. सायंकाळचा पिक अवर्स बंधनकारक राहील.

