PM Narendra Modi On Delhi Protest : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनादरम्यान पीएम मोदींविरोधात आंदोलक तरुणांनी आक्षेपार्ह विधानं केली होती. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत देशातील GEN-Z तरुणांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान मला आणि माझ्या आईला शिव्या देणाऱ्या मुलांना मी माफ करतो, असं म्हटलंय. तसंच सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करण्याचं भावनिक आवाहन त्यांनी देशातील तरुणांना केले. पीएम मोदी यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून चर्चेत आला आहे.
पीएम मोदींनी GEN-Z ना केलेलं आवाहन
"आज मला तुमच्याशी फक्त संवाद साधावासा वाटतोय. जंतरमंतरवर काय घडलं हे देशाने आणि जगाने पाहिलं आहे. काही खोडकर मुलांनी अतिशय असभ्य आणि अपमानास्पद भाषा वापरली, असे शब्द जे कोणत्याही सुसंस्कृत समाजाला शोभणारे नाहीत. माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करण्यात आली आणि माझ्या दिवंगत आईबद्दलही अपशब्दांचा वापर करण्यात आला. ते खरोखरच एक अत्यंत क्लेशदायक दृश्य होते.
परंतु, मला यावर बोलायचे आहे की बालपणात चुका होत असतात आणि बालपणच या चुका सुधारण्याची संधी देखील देते; तरुण असण्याचा तो एक स्वभावच आहे. त्यामुळे समाजातील संताप मी पूर्णपणे समजू शकतो. आपल्या लेकी-बाळी अशी भाषा वापरताना पाहून सांस्कृतिक धक्का बसणे स्वाभाविक आहे.
तरीही, आता या मुलांना जवळ घेण्याची आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची वेळ आली आहे. ते भरकटले आहेत आणि त्यांना दिशा दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना शिक्षा करणे, न्यायालयाच्या चकरा मारायला लावणे आणि समाजात त्यांचा छळ करणे, याने परिस्थिती बदलणार नाही. मला त्यांना माफ करायचे आहे. समाजानेही हे स्वीकारले पाहिजे.
माझ्या मनात फक्त एकच भावना आहे. कधीकधी आपली जीभ दातांखाली येते आणि रक्त निघते, म्हणून आपण आपले दात पाडत नाही; शेवटी दात आणि जीभ दोन्ही आपलेच असतात. ही मुलेही आपलीच आहेत. त्यांना सन्मार्ग दाखवणे हे आपले कर्तव्य आहे. भरकटलेल्यांना मार्ग दाखवणे कठीण असते, पण हे काम आपल्याला करावेच लागेल.
म्हणून या, मी या मुलांना आवाहन करतो, देशासाठी आपण एकत्र पुढे जाऊया. काहीतरी नवीन शिकूया आणि आपल्या चुकांमधूनही धडा घेऊया. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण सज्ज होऊया. देश पुढे जात आहे आणि आणखी प्रगती करण्यासाठी सज्ज आहे, आणि तुम्हीही पुढे जावे हे माझे स्वप्न आहे. मी तुमच्यासाठीच जगतोय; तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी स्वतःला समर्पित केले आहे. चला, आपण एकत्र मिळून देशाला पुढे नेऊया. चुकांमधून शिका आणि पुढे चला."

